Vishal Dadlani : देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशद्वार मानली जाणारी ‘नीट’ (NEET) परीक्षा सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पेपर फुटीचे प्रकरण आणि त्यानंतर समोर येणारे धक्कादायक खुलासे यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. रात्रंदिवस अभ्यास करून, स्वप्ने उराशी बाळगून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाची या व्यवस्थेत काही किंमत आहे का, असा संतप्त सवाल आज समाजाच्या सर्व स्तरांतून विचारला जात आहे. केवळ विद्यार्थी आणि पालकच नव्हे, तर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही या अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवत सरकार आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीवर अत्यंत मार्मिक टिपणी केली होती. देशाच्या शिक्षण खात्यातील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी विद्यार्थ्यांच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यानंतर, सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी याने देखील या प्रकरणावर आपली परखड मते मांडली. विशालने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्याच्या भूमिकेला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला असला, तरी काही वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले.
या संपूर्ण प्रकरणाने केवळ परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही खोलवर परिणाम केला आहे. दरवर्षी पेपर फुटीच्या घटना समोर येणे आणि त्यानंतर केवळ चौकशीचे आश्वासन मिळणे, हे दुष्टचक्र आता थांबायला हवे, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. जेव्हा विशाल दादलानी किंवा अतुल कुलकर्णी यांच्यासारखे प्रभावशाली लोक अशा विषयांवर बोलतात, तेव्हा त्या विषयाचे गांभीर्य अधिक वाढते.
विशाल दादलानी आणि ‘इंडियन आयडॉल’ वादाचे नेमके सत्य काय? अफवांचे पेव आणि वस्तुस्थिती
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी सध्या दोन कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत; एक म्हणजे ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहारावर त्यांनी व्यक्त केलेले परखड मत आणि दुसरे म्हणजे लोकप्रिय गायन स्पर्धा ‘इंडियन आयडॉल’मधील त्यांचे परीक्षक म्हणून असलेले स्थान. विशाल दादलानी यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गोंधळावर भाष्य केल्यानंतर, त्यांना या शोमधून डीच्चू देण्यात आल्याच्या वावड्या समाजमाध्यमांवर उठल्या आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या उलट ‘सोनी टीव्ही’ने नुकताच आपल्या अधिकृत पेजवरून ‘इंडियन आयडॉल’च्या १६ व्या पर्वाचा एक प्रोमो प्रदर्शित केला असून, त्यामध्ये विशाल दादलानी नेहमीच्या उत्साहात गाताना दिसत आहेत. या प्रोमोमुळे त्यांना शोमधून काढल्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असला, तरी प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
विशाल दादलानी आणि या शोचे नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये विशाल यांनी स्वतःहून हा शो सोडत असल्याची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. सलग सहा वर्षे या मंचाला आपले योगदान दिल्यानंतर, आपल्या खाजगी संगीत कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. नवीन गाण्यांची निर्मिती, संगीत मैफिली आणि वैयक्तिक सादरीकरण या गोष्टींना पुरेसा वेळ देता यावा, ही त्यामागची मुख्य भूमिका होती. या निर्णयाची रीतसर माहिती त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली होती. असे असतानाही, १६ व्या पर्वात त्यांनी पुन्हा एकदा परीक्षकाची धुरा सांभाळल्याने चाहत्यांना आनंद झाला होता; मात्र ‘नीट’ प्रकरणातील त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा त्यांच्या शोमधील भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरत असलेल्या दाव्यांनुसार, त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक टिपणीमुळे वाहिनीने त्यांना काढण्याचा निर्णय घेतला असावा, असे तर्क लढवले जात आहेत. परंतु, विशाल दादलानी यांनी स्वतःहून किंवा वाहिनीने अधिकृतपणे यावर भाष्य केलेले नाही. केवळ एका विधानामुळे इतक्या मोठ्या कलाकाराला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल का, असा सवालही विचारला जात आहे. विशाल यांनी सातत्याने आपली मते निर्भीडपणे मांडली आहेत, ज्यामुळे अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तरीही, ‘इंडियन आयडॉल १६’ च्या प्रोमोमध्ये त्यांची असलेली उपस्थिती ही सध्याच्या अफवांना छेद देणारी ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य केवळ अधिकृत निवेदनानंतरच स्पष्ट होईल.
विशाल दादलानींच्या या भूमिकेवरून वाद निर्माण झाला असला तरी, त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खंबीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुकही होत आहे. टेलिव्हिजन विश्वात कलाकारांच्या विधानावरून त्यांना कामावरून कमी करण्याचे प्रकार नवीन नाहीत, मात्र जोपर्यंत वाहिनीकडून यावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच मानल्या पाहिजेत.
काय होत विशाल दादलानीच नीटपेपर फुटी प्रकरणावरील वक्तव्य?”सत्तेत बसलेले लोक सुशिक्षित नाहीत…” विशाल दादलानी यांचा राज्यकर्त्यांवर प्रहार-
‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, या संवेदनशील विषयावर सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी यांनी अत्यंत परखड भूमिका मांडली. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून एक व्हिडिओ प्रसारित करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथांना वाचा फोडली. विशाल दादलानी म्हणतात की, हा व्हिडिओ बनवण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश त्या विद्यार्थ्यांचे सांत्वन करणे हा आहे, ज्यांचे अनमोल वर्ष आणि कठोर परिश्रम या पेपरफुटीमुळे वाया गेले आहेत. ही केवळ तांत्रिक चूक नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला क्रूर खेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
https://www.instagram.com/reel/DYVZUE2Ovg1/?igsh=MWFsMWN3aGRwZW84aA%3D%3D
देशातील परीक्षा पद्धतीवर टीका करताना दादलानी यांनी व्यवस्थेतील बेजबाबदारपणावर बोट ठेवले. ते म्हणतात की, अशा प्रकारच्या गंभीर घटना दरवर्षी घडत आहेत, परंतु दुर्दैवाने देशातील कोणतीही संस्था किंवा यंत्रणा याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. सर्वात खेदजनक बाब म्हणजे, सत्तेतील उच्च पदावर बसलेले मंत्री जेव्हा अशा प्रकरणांना क्षुल्लक मानतात, तेव्हा व्यवस्थेचा निर्दयी चेहरा समोर येतो. “यात काय मोठी गोष्ट आहे?” अशा प्रकारची विधाने करणे हे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादलानी यांनी थेट सत्तेतील अकार्यक्षमतेवर प्रहार करत म्हटले की, आपण अशा एका काळात जगत आहोत जिथे शिक्षणाला शून्य किंमत उरली आहे, कारण सत्तेची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते स्वतः सुशिक्षित नाहीत. ही ‘अशिक्षित’ प्रवृत्तीच भविष्यात भारताच्या प्रगतीला घातक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
केवळ टीका करून न थांबता विशाल दादलानी यांनी देशातील जनतेला आणि विशेषतः तरुण मतदारांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. देशाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर मतदानाचा विचार करताना जात, धर्म, पंथ किंवा कौटुंबिक नातेसंबंध यांसारख्या संकुचित चौकटींच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. जो उमेदवार सुशिक्षित आहे आणि ज्याला शिक्षणाचे महत्त्व समजते, त्यालाच जनतेने कौल द्यावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, मग तो उमेदवार तुमच्या जातीचा असो किंवा धर्माचा, आता सहन करण्याची सीमा संपली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.










