Home / महाराष्ट्र / Film Corporation Elections : मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा! उद्योगमंत्री उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्के रिंगणात उतरताच सुप्रिया सुळे अन् वडेट्टीवारांचा कडक प्रहार!

Film Corporation Elections : मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा! उद्योगमंत्री उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्के रिंगणात उतरताच सुप्रिया सुळे अन् वडेट्टीवारांचा कडक प्रहार!

Film Corporation Elections : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...

By: Team Navakal
Film Corporation Elections
Social + WhatsApp CTA

Film Corporation Elections : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कलेच्या या प्रांगणात यंदा लोकशाही मूल्यांचा संकोच होत असल्याची ओरड सुरू झाली असून, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी लावलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पाटकर यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर (OSD) गंभीर ठपका ठेवला आहे. आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यापासून जाणीवपूर्वक रोखण्यात आले असून, चित्रपट महामंडळात राजकीय हस्तक्षेप आणि दडपशाहीचा नंगा नाच सुरू असल्याचा दावा पाटकरांनी केला आहे. या अनपेक्षित वळणामुळे चित्रपटसृष्टीतील ही निवडणूक आता एका राजकीय युद्धाच्या मैदानात रूपांतरित झाली आहे.

या प्रकरणावरून विरोधकांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या पत्नी नीलम सामंत यांच्यावर तोफ डागली आहे. मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीला भाजपच्या दडपशाहीचे ‘जिवंत उदाहरण’ असे संबोधले आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करत, मंत्र्यांच्या ‘ओएसडी’कडून धमकावले जात असल्याचा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. आमदार रोहित पवार यांनीही कलाकारांचा आवाज दाबला जात असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अभिनेते विजय पाटकर यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. “गेल्या दहा वर्षांत महामंडळाचे नुकसान करणाऱ्यांनी मला त्यांच्या पॅनेलमध्ये सामील होण्याची विनंती करणे ही लाजिरवाणी बाब आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे सात-सात महिने पगार थकल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कलाक्षेत्रात राजकारण्यांचा शिरकाव कशासाठी, असा सवाल करत त्यांनी नीलम शिर्के यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे स्पष्ट केले, परंतु स्वतःचे पॅनेल उभे करण्यापासून आपल्याला पद्धतशीरपणे रोखण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ४० वर्षांच्या कारकिर्दीत असा अनुभव कधीच आला नसल्याचे त्यांनी भावूक होत नमूद केले.

विजय पाटकर यांच्या या आरोपांना मेघराज राजेभोसले यांनीही तितक्याच जशास तसे उत्तर दिले आहे. पाटकरांच्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी त्यांना “चित्रपटसृष्टीतील कलंक” आणि “लबाड” असे संबोधले. पाटकरांनी आपल्या कार्यकाळात लोकांना अनुदानाचे आमिष दाखवून फसविल्याचा प्रत्यारोप भोसले यांनी केला आहे. “जर तुला अर्ज भरण्यापासून रोखले गेले, तर त्या मंत्र्यांची आणि ओएसडीची नावे जाहीर कर,” असे आव्हानही त्यांनी दिले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या