Farmers Protest : राज्यामध्ये कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे उत्पादक शेतकरी हवालदील झाला असून, या प्रश्नावरून आज संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळाली. प्रति किलो केवळ सव्वा रुपया असा कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांमध्ये तीव्र निदर्शने केली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकारने कांदा खरेदी दरात काही प्रमाणात वाढ जाहीर केली असली, तरी ती अत्यंत तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून, ही दरवाढ नाकारत शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले. “ज्यांना प्रत्यक्ष कांदा कापतानाही कधी वेदना झाल्या नाहीत, ते आज राजकीय स्वार्थापोटी मगरीचे अश्रू गाळत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मात्र, आंदोलनाची तीव्रता आणि शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी नमती भूमिका घेत कांदा प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी आपण उद्या तातडीने दिल्लीला रवाना होत असल्याचे जाहीर केले आहे.
चांदवडमध्ये महामार्ग रोखला; वाहतूक विस्कळीत
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आंदोलनाचे सर्वात रौद्र रूप पाहायला मिळाले. मुंबई-आग्रा महामार्गावर शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी ट्रकभर कांदे महामार्गावर ओतून आपला आक्रोश व्यक्त केला. सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलक नेत्यांना ताब्यात घेतले, मात्र तरीही अनेक शेतकरी रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते.
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा, अन्यथा मंत्रालयाला वेढा घालू; चांदवडच्या आंदोलनात महाविकास आघाडीचा निर्वाणीचा इशारा-
कांद्याच्या कोसळलेल्या दरावरून चांदवड येथे झालेल्या विराट आंदोलनात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांसह आघाडीतील अनेक दिग्गज नेते सक्रियपणे सहभागी झाले होते. भररस्त्यात ठिय्या मांडत या नेत्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले.
आमदार रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
आंदोलनाला संबोधित करताना आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आश्वासनांच्या पूर्ततेवरून थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या प्रचारात फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो २४ रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता हाती येताच आणि राजकीय स्वार्थ साध्य होताच, ते आता केवळ १२ रुपयांची भाषा करत आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे.”
पवार यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर भाष्य करताना म्हटले की, “राजकारणी आणि व्यापारी कशाही प्रकारे आपले जीवन जगू शकतील, परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला शेतकरी मात्र उद्ध्वस्त होईल. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यातच आता दुष्काळाचे सावट आहे. जर सरकारने तातडीने आर्थिक मदत केली नाही, तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.”
त्यांनी पुढे अशी मागणी केली की, कांद्याचा उत्पादन खर्च विचारात घेता शासनाने किमान २४ रुपये दराने खरेदी करावी आणि ‘नाफेड’च्या माध्यमातून ही खरेदी थेट बाजार समित्यांमध्ये व्हावी, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळेल.
शेतकरी प्रश्नांवरून विरोधक आक्रमक; राज्यभरात कांदा आणि इंधन दरवाढीविरोधात तीव्र आंदोलने
राज्यातील बळीराजाच्या विविध समस्या आणि वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज राज्यभरात विरोधी पक्षांकडून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कोलमडलेले बजेट या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बैलगाडीतून आगमन आणि सरकारचा निषेध
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी चक्क बैलगाडीतून आंदोलनस्थळ गाठले. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी सरकार केवळ १० ते १२ रुपये दराने कांदा खरेदी करत आहे. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून, शेतकऱ्यांच्या कष्टाची अशी थट्टा करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही,” अशी जळजळीत टीका सपकाळ यांनी केली.
नागपुरात इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा
दुसरीकडे, उपराजधानी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीच्या विरोधात ‘सायकल मोर्चा’ काढण्यात आला. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच देशावर इंधन संकट ओढवल्याचा आरोप देशमुख यांनी केला. “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घट झालेली असतानाही, त्याचा लाभ सामान्यांना न देता सरकार नफेखोरी करत आहे. सरकारने तात्काळ इंधन दर कपात करून जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सोलापुरात रास्तारोको आणि फडणवीसांची टीका
सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर-हैदराबाद महामार्गावर ‘रास्तारोतो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांदे फेकून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, या आंदोलनावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. “प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या असून, त्यांच्या विधानांमधून त्यांची राजकीय अपरिपक्वता स्पष्टपणे दिसून येते,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा रस्त्यावर-
शेतकऱ्यांच्या रोषाची धग छत्रपती संभाजीनगरमध्येही पहायला मिळाली. गंगापूर-वैजापूर महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावाचा निषेध करत कांदे रस्त्यावर फेकून दिले. गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल केवळ १०० ते १३० रुपये इतका नीचांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.










