Onions priced at just ₹1.25 per kg ! Farmers devastated –कांद्याला किलोला सव्वा रुपया हा कवडीमोल भाव मिळत असल्याने हवालदील झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वात नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे जोरदार आंदोलन केले. याच दरम्यान केंद्र सरकारने कांदा खरेदीचा भाव वाढवला, पण ही वाढही तुटपुंजी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहिले. यामुळे संतप्त होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करीत म्हटले की, ही राजकीय आंदोलने आहेत. कांदा कापूनही ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही ते आता अश्रू गाळत आहेत. मात्र अखेर या आंदोलनाचा परिणाम झाला आणि कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मी उद्या दिल्लीला जातो आहे, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून राज्य आणि केंद्र सरकारच्या नावाने आक्रोश केला. मुंबई-आग्रा महामार्गावर ठिय्या देत रस्त्यावर कांदे ओतून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. संतप्त शेतकऱ्यांनी सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली.आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही शेतकरी महामार्गावर ठिय्या देऊन बसले.
कांद्याला हमीभाव मिळावा आणि पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने राज्यव्यापी आंदोलन केले. नाशिकसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि सोलापू आदि शहरांमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला.
चांदवडमध्ये झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उबाठाचे नेते आमदार अंबादास दानवे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि मविआतील अन्य घटक पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
याप्रसंगी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 24 रुपये किलो हा भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता निवडणुका झाल्या, स्वतःचा राजकीय स्वार्थ साधल्यानंतर तेच फडणवीस कांद्याला 12 रुपये भाव देण्याची भाषा करत आहेत. शेतकऱ्यांची अशी फसवणूक करू नका, आश्वासनाची पूर्तता करा.
नेते, व्यापारी कसेही जगतील, पण शेतकऱ्यांना मदत केली नाही तर ते आत्महत्या करतील. येणारे वर्षही दुष्काळी आहे. त्यामुळे मिळकत नाही. अवकाळी व गारपीटीने आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे रोहित पवार म्हणाले. बारा रुपयांत कांद्याचा उत्पादन खर्चदेखील भागत नाही. सरकारने शेतकऱ्यांकडून 24 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि वाटल्यास तो परदेशात विकावा.
नाफेडने थेट बाजार समितीतून कांदा खरेदी केला तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे उचित मोल मिळेल, असे रोहित पवार पुढे म्हणाले. राज्यातील महायुतीचे सरकार म्हणजे ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’, असा सारा मामला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे याच्याशी सरकारला काही देणेघेणे नाही.कांद्याला हमीभाव देण्यासाठी सरकारला दिल्लीला जावे लागते हे लाजिरवाणे आहे. सरकार जर शेतकऱ्याकडे असेच दुर्लक्ष करणार असेल तर यापुढचे आंदोलन मंत्रालयासमोर केले जाईल. एकाही मंत्र्याला मंत्रालयात शिरू देणार नाही, असा इशारा उबाठाचे अंबादास दानवे यांनी दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बैलगाडीतून आंदोलनस्थळी आले होते. संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला रास्त भाव देण्याऐवजी दहा-बारा रुपयांत कांदा खरेदी करताना सरकारला लाज वाटली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन संकट ओढवले आहे.
आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्याचा लाभ सरकारने देशवासीयांना दिला पाहिजे. इंधन दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांनी सोलापूर-हैदराबाद महामार्ग काही काळ रोखून धरला. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांदे फेकून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. यावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रणिती शिंदे पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा अपरिपक्वपणा दिसतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर-वैजापूर महामार्गावर आंदोलन केले. गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी कांदे फेकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आज येथे कांद्याला क्विंटलला 100 ते 130 रुपये भाव होता.
सपकाळांची जीभ घसरली
नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधान नरेंद्र यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली. आंदोलकांसमोर भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत आणि आक्षेपार्ह उल्लेख केला. देशाच्या पंतप्रधानांविषयी अशा प्रकारची भाषा वापरल्यामुळे सपकाळ यांच्यावर टीका होत आहे . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत, पण मोदीजी खरे धुरंधर आहेत. त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर आहेत.










