Ceasefire? Agreement? Nothing -US launches another strike on Iran – अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपुष्टात येते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या या दोन देशांदरम्यान तात्पुरती युद्धबंदी लागू आहे. कायमस्वरुपी युद्धबंदीसाठी उभयपक्षी वाटाघाटी सुरू आहेत. काल रविवारी युद्धबंदी जाहीर होईल असे वाटत असतानाच अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू केले. अमेरिकेने इराणचे क्षेपणास्त्र तळ आणि समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या इराणच्या बोटींना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. इंधन टंचाईने बहुतांश देश ग्रस्त आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) मात्र म्हटले की, इराणवरील हल्ला ही अमेरिकेने स्वसंरक्षणासाठी केलेली कारवाई होती. सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स म्हणाले की, अमेरिकन सैनिक आणि युद्धनौकांना वाचवण्यासाठी ही कारवाई करणे आवश्यक होते. कारण इराणच्या बोटी होर्मुजच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करत होत्या. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय जहाजे आणि अमेरिकेच्या युद्धनौकांना धोका निर्माण होऊ शकला असता.
अमेरिकेच्या हल्ल्याला इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डकडून तातडीने प्रत्युत्तर दिले नाही. तरी शांततेसाठी वाटाघाटी सुरू असताना अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे शांतता प्रक्रिया रुळावरून घसरते की काय अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
अमेरिका आणि इराण दोघांनाही युध्द सुरू ठेवणे नको आहे. मात्र त्याचवेळी या दोघांनाही आपापल्या मुद्यांवरून तसूभरही मागे सरकायचे नाही. त्यामुळेच शांतता करार नेमका कोणत्या अटींवर होणार यात काहीही स्पष्टता नाही. होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील आपला अधिकार सोडायला इराण तयार नाही. त्याचबरोबर इराणकडे असलेले समृध्द युरेनियम हा कळीचा मुद्दा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समृध्द युरेनियमचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. अणू शस्त्र बनविण्यासाठी युरेनियम लागते. अणुशस्त्र इराणने बनवायचे नाही हा अमेरिकेचा हट्ट आहे. इराणसोबत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा करार करणार नाही. एकतर अमेरिकेच्या दृष्टीने चांगला करार तरी होईल किंवा काहीही होणार नाही, अशी आडमुठी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.
ट्रम्प यांच्या बोलण्याचा अर्थ असा की, इराण जोपर्यंत आपला अणुकार्यक्रम सोडून देऊन समृध्द युरेनियमचा साठा अमेरिकेच्या हाती सोपवण्यास तयार होत नाही तोपर्यंत इराणशी चांगला करार होऊ शकणार नाही. तर दुसरीकडे आपल्या अणु कार्यक्रमावर इराण ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत देशातील युरेनियम देशाबाहेर जाता कामा नये, असे आदेशच इराणचे
सर्वोच्च धार्मिक नेते मोजताबा खामेनी यांनी दिला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजश्कियान यांनी स्पष्टच सांगितले आहे की, इराण कोणताही मोठा निर्णय सर्वोच्च नेत्याच्या मंजुरीशिवाय घेणार नाही. दुसरीकडे ज्या इस्रायलने इराणविरुध्द युध्दाची सुरुवात केली त्या इस्रायलच्या नाकावर टिच्चून इराण आजही लेबनॉन आणि हिजबुल्लाच्या पाठीशी उभा आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी नुकताच लेबनॉन आणि हिजबुल्लाच्या समर्थनार्थ संदेश जारी केला आहे.
लेबनॉनच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक अखंडतेच्या बाजूने इराण नेहमीच उभा राहील, असे अराघची यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. अराघची यांच्या या संदेशातून इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असा स्पष्ट संदेश दिला गेला आहे. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास युध्दबंदी करार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.










