Atal Pension Yojana: देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार एक अत्यंत फायदेशीर योजना चालवत आहे, जिचे नाव ‘अटल पेन्शन योजना’ असे आहे. सन 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) नियंत्रित केली जाते.
विशेषतः गरीब, गरजू आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित पैशांची अडचण भासू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Atal Pension Yojana : योजनेसाठी पात्रता काय आहे?
या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही सोपे नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत:
- वयोमर्यादा: १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतो.
- करदात्यांना बंदी: ऑक्टोबर 2022 च्या नवीन नियमांनुसार, जे नागरिक प्राप्तिकर भरतात, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- बँक खाते अनिवार्य: अर्जदाराकडे आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते आणि वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- गुंतवणुकीचा कालावधी: या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना किमान 20 वर्षे नियमित योगदान द्यावे लागते.
Atal Pension Yojana : दरमहा किती पेन्शन आणि गुंतवणूक किती?
या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर युजर्सना दरमहा 1,000, 2,000, 3,000, 4,000 किंवा ५,००० रुपयांची गॅरंटीड पेन्शन मिळते. पेन्शनची रक्कम तुम्ही दरमहा किती गुंतवणूक करता यावर अवलंबून असते.
गुंतवणुकीची रक्कम तुमच्या बँक खात्यातून दरमहा ऑटो-डेबिट (आपोआप कट) केली जाते. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी जोडले गेलात, तर तुम्हाला दरमहा ४२ ते २१० रुपयांचे योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी योजना सुरू केली, तर दरमहा २९१ ते १,४५४ रुपयांपर्यंत प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा ६ महिन्यांच्या कालावधीत भरू शकता.
Atal Pension Yojana : हप्ता न भरल्यास काय होते?
बँक खात्यात पुरेसा बॅलन्स न ठेवल्यास किंवा हप्ता वेळेवर न दिल्यास बँक छोटा दंड वसूल करते. दरमहा १०० रुपयांपर्यंतच्या हप्त्यासाठी १ रुपया, तर १,००१ रुपयांपेक्षा जास्त हप्त्यासाठी १० रुपये प्रतिमहिना दंड आकारला जातो.
- ६ महिने हप्ता न भरल्यास: खाते गोठवले (फ्रीज) जाते.
- १२ महिने हप्ता न भरल्यास: खाते निष्क्रिय केले जाते.
- २४ महिने हप्ता न भरल्यास: खाते कायमचे बंद केले जाते आणि जमा झालेली रक्कम संबंधित व्यक्तीला परत दिली जाते.
Atal Pension Yojana : पैशांची सुरक्षा आणि कर सवलतीचा फायदा
योजनेदरम्यान खातेदाराचा मृत्यू झाल्यास, पेन्शनची रक्कम त्याच्या पती किंवा पत्नीला दिली जाते. दोघांचाही मृत्यू झाल्यास ६० वर्षांपर्यंत जमा झालेला संपूर्ण निधी (कॉर्पस) नॉमिनी म्हणजेच वारसदाराला परत मिळतो. वयाच्या ६० वर्षांपूर्वी केवळ गंभीर आजारपण किंवा मृत्यू अशा आणीबाणीच्या परिस्थितीतच खात्यातून पूर्ण पैसे काढण्याची परवानगी मिळते.
या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80CCD अंतर्गत १,५०,००० रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. याशिवाय कलम 80CCD(1B) अंतर्गत आणखी ५०,००० रुपयांची अतिरिक्त कर सवलत मिळवता येते.
Atal Pension Yojana : ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा?
ऑफलाइन पद्धत: तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन एपीयूपी (APY) फॉर्म भरा. फॉर्मसोबत आधार कार्डची छायाप्रत आणि केवायसी (KYC) कागदपत्रे जोडून सबमिट करा. अर्ज मंजूर झाल्यावर मोबाईलवर मेसेज येईल.
ऑनलाइन पद्धत: तुमच्या बँकेच्या नेटबँकिंग सुविधेमध्ये लॉगिन करा. तिथे ‘Atal Pension Yojana’ चा पर्याय शोधून ऑटो-डेबिट पर्याय निवडा आणि फॉर्म सबमिट करा.
हे देखील वाचा – Karnataka Political Crisis: कर्नाटक राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देण्याची शक्यता; डीके शिवकुमार यांच्याकडे सत्ता?









