Bakri Eid : मीरा रोड येथील बकरा कुर्बानीच्या वादानंतर आता या प्रकरणाचे पडसाद थेट मुंबईतील गृहनिर्माण संस्थांपर्यंत (सोसायट्यांपर्यंत) पोहोचले आहेत. घाटकोपरमधील सागर पार्क आणि गोरेगावमधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीच्या मुद्द्यावरून आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. प्रशासनाने ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आणि राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेतल्याने मुंबईतील वातावरण कमालीचे तापले असून संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत ३० वर्षांच्या परंपरेला ब्रेक-
घाटकोपर येथील सागर पार्क सोसायटीत गेल्या तीन दशकांपासून बकरा कुर्बानीची परंपरा शांततेत पार पडत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, यावर्षी अचानक मध्यरात्री मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेली परवानगी रद्द केल्याने वादाला तोंड फुटले. या निर्णयामुळे सोसायटीतील मुस्लीम बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली. प्रशासनाचा हा निर्णय समजताच परिसरात तणाव निर्माण झाला, ज्याची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची (SRPF) तुकडी आणि स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पाचारण करण्यात आला.
मुस्लीम बांधवांची सामंजस्याची भूमिका-
सोसायटीचे नाव खराब होऊ नये आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा, यासाठी मुस्लीम समुदायाने सामंजस्याची भूमिका मांडली. “आम्ही सोसायटीच्या आवारात कुर्बानी करणार नाही, परंतु महापालिकेने आम्हाला तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. धार्मिक भावना जपण्यासोबतच सोसायटीच्या नियमांचा आदर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली असली, तरी ऐनवेळी परवानगी रद्द झाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.
किरीट सोमय्या यांची आक्रमक भूमिका आणि राजकीय पेच-
या वादाची माहिती मिळताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीला भेट दिली. यावेळी काही नागरिक सोसायट्यांमध्ये बकऱ्या घेऊन आल्याने गोंधळ वाढला होता. सोमय्या यांनी प्रशासनाला यावर जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे या वादाला राजकीय वळण मिळाले. दुसरीकडे, गोरेगावच्या गोकुळधाम परिसरातही रहिवाशांनी सोसायट्यांमध्ये कुर्बानी देण्यास कडाडून विरोध दर्शवला. या विरोधामुळे परिसरात काही काळ वादावादीचे प्रसंग ओढवले.
मुंबईत कुर्बानीवरून संघर्षाची ठिणगी; घाटकोपर ते गोरेगाव संतापाची लाट, किरीट सोमय्या आणि लोकप्रतिनिधी आक्रमक-
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर निवासी सोसायट्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या कुर्बानीचा वाद आता चिघळला असून मुंबईतील घाटकोपर आणि गोरेगाव परिसरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले आहे. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या भेटीनंतर प्रशासकीय यंत्रणा हलली असून, गोरेगावमध्येही स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. धार्मिक प्रथा आणि निवासी संकुलांमधील नियम यावरून सुरू झालेल्या या वादात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतल्याने प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
घाटकोपर: ३१ पैकी २३ बोकड पालिकेच्या ताब्यात, सोमय्यांचा मोठा दावा-
घाटकोपर येथील सागर पार्क सोसायटीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला जाब विचारला. “या ठिकाणी कुर्बानीसाठी आणलेल्या ३१ बोकडांपैकी २३ बोकड महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहेत,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केले असून, चुकीच्या माहितीच्या आधारे (Misrepresentation) काही विंगमध्ये परवानगी मिळवण्यात आली होती, असा दावाही त्यांनी केला. या सोसायटीत कोणत्याही परिस्थितीत कत्तल होऊ दिली जाणार नाही आणि पालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे परिसरातील वातावरण अधिकच तापले होते.
गोरेगाव: इस्कॉन केंद्र आणि शाळांच्या सान्निध्यात कुर्बानीला कडाडून विरोध-
गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातील सॅटेलाईट गार्डन फेज-२ मध्येही कुर्बानीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील आझाद नगर डी-३ इमारतीच्या आवारात उघड्यावर कुर्बानी करण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या पी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. “या परिसरात इस्कॉन केंद्र, दोन नामांकित शाळा आणि मोठी वर्दळ असते. महापालिकेच्या नियमांनुसार खुल्या जागेत किंवा निवासी भागात अशा कृत्यांना मनाई आहे. जर कोणी बळजबरीने उघड्यावर कुर्बानी देण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण गोकुळधामचे नागरिक रस्त्यावर उतरतील,” असा इशारा सातम यांनी दिला आहे.
रहिवाशांच्या वेदना आणि अस्वच्छतेचा प्रश्न-
गोकुळधाम परिसरातील एका माजी रहिवाशाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “मी स्वतः या भागात १५-२० वर्षे राहत होतो, मात्र उघड्यावर होणाऱ्या या प्रकारांमुळे निर्माण होणारी अस्वच्छता आणि त्रासामुळे मला अखेर माझे घर विकून तिथून स्थलांतर करावे लागले.” सण साजरा करण्यास कोणाचीही मनाई नाही, मात्र तो घरात किंवा निश्चित केलेल्या अधिकृत जागेतच साजरा व्हायला हवा, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून काही ठिकाणी लपूनछपून असे प्रकार सुरू असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे.
मिरा रोड परिसरात तणावानंतर पोलिसांची कठोर कारवाई; ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल, चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक-
मिरा रोड येथील पूनम एस्टेट क्लस्टर-१ या गृहनिर्माण संस्थेमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून उद्भवलेल्या वादाला आता हिंसक वळण लागले असून, याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ५० जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि अटक सत्र-
अधिकच्या माहितीनुसार, या वादादरम्यान समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने सोसायटीत डुक्कर घुसविण्याचा प्रयत्न करणे, प्रक्षोभक धार्मिक घोषणाबाजी करणे आणि प्रशासनाने लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर झालेला चाकू हल्ला होय. या हिंसक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अब्दुल कादरबाशा शेख (२२) या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सरकारी कामात अडथळा आणि बकऱ्यांचे स्थलांतर-
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलही काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तणावाचे वातावरण निवळण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून सोसायटीच्या आवारात असलेले ५१ बकरे तेथून हटवले असून, त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाचे भविष्यातील नियोजन: नवीन नियमावली आणि कत्तलखान्याचा प्रस्ताव-
अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. रहिवासी सोसायट्यांमध्ये बकरे ठेवण्याबाबत किंवा विक्री करण्याबाबत नवीन नियमावली (SOP) तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.











