Instagram, Facebook, WhatsApp Get Paid Features – इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप या सर्वांच्या आवडत्या व मोफत असलेल्या सोशल मीडियाला ब्रेक लागणार आहे. याचे कारण म्हणजे त्यांची मालक कंपनी ‘मेटा’ने आता इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरसाठी शुल्क आकारले आहे. हे नवे फिचर काही काळाने विकत घ्यावेच लागणार आहेत. त्यामुळे या सोशल मीडियाच्या विशिष्ट नव्या प्रगत फिचर असलेल्या सेवेचा वापर करण्यासाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. या निर्णयाचा परिणाम भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांवर होणार आहे.
मेटाच्या उत्पादन प्रमुख नाओमी ग्लीट यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही घोषणा केली आहे. मेटाच्या नव्या प्लॅनमध्ये ‘प्लस’ आणि ‘मेटा वन’ असे पर्याय देण्यात आले आहेत. खास फीचर वापरण्यासाठी आता दरमहा पैसे द्यावे लागणार आहेत. मेटाने म्हटले आहे की, आता केवळ जाहिरातींवर अवलंबून न राहता कंपनी सब्सक्रिप्शनमधूनही पैसे मिळवणार आहे. या नवीन मॉडेलनुसार, प्रीमियम फीचर फक्त पैसे देणाऱ्या युजरसाठी उपलब्ध असतील.
‘इन्स्टाग्राम प्लस’ आणि ‘फेसबुक प्लस’साठी सुमारे 3.99 डॉलर (सुमारे 387 रुपये) प्रति महिना शुल्क ठेवण्यात आले आहे, तर व्हॉट्सॲप प्लससाठी 2.99 डॉलर (सुमारे 290 रुपये) प्रति महिना आकारले जाणार आहे. भारतासाठी तूर्त शुल्क अद्याप जाहीर केलेले नाही. पण ते काही दिवसांत जाहीर होईल. इन्स्टाग्राम प्लस वापरकर्त्यांना स्टोरीज किती लोकांनी पुन्हा पाहिल्या याची माहिती, लपून स्टोरीज पाहण्याची सुविधा, स्टोरीजची मर्यादा 24 तासांपेक्षा जास्त वाढवण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय प्रोफाईल कस्टमायझेशन, नवीन इमोजी आणि खास फॉन्ट्ससारखे फीचर मिळतील. ‘व्हॉट्सॲप प्लस’मध्ये चॅट कस्टमायझेशन, नवीन थीम, खास रिंगटोन, प्रीमियम स्टिकर आणि चॅट पिनिंगसारखे फीचर दिले जातील.
‘मेटा वन’ नावाचे नवीन एआय आणि बिझनेस प्लॅनही सादर केले आहेत. यामध्ये एआय वापरासाठी दोन सशुल्क प्लॅन असतील. यातील एक 775 रुपये प्रति महिना आणि दुसरा 1,939 रुपये प्रति महिना असेल. या प्लॅनमध्ये इमेज जनरेशन, व्हिडिओ क्रिएशन आणि एआय टूल्सचा जास्त वापर करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय क्रिएटर आणि व्यावसायिकांसाठीही स्वतंत्र सब्सक्रिप्शन प्लॅन आणले आहेत, ज्यात व्हेरिफिकेशन, चांगली पोहोच, ॲडव्हान्स ॲनालिटिक्स आणि ग्राहक सहाय्य यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
सोशल मीडिया ॲपची सवय लागलेल्यांना शेवटी सशुल्क पर्यायाकडे वळावेच लागणार आहे. कारण तिथेच नवे फिचर उपलब्ध असणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पायाभूत सुविधांवरील प्रचंड खर्चामुळे मेटावर दबाव वाढत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
खर्च कमी करण्यासाठी नुकतीच मेटाने नोकरकपातही केली आहे. कंपनीने यावर्षी तब्बल 125 अब्ज ते 145 अब्ज डॉलर खर्चाचा अंदाज वर्तवला आहे. तो प्रामुख्याने एआय डेटा सेंटर आणि संबंधित तंत्रज्ञानावर होणार आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ‘एक्स’ने काही दिवसांपूर्वी सशुल्क सेवा सुरू केल्यावर त्यांच्या महसुलात वाढ झाली होती. त्याच धर्तीवर मेटानेही सशुल्क प्रीमियम सेवा सुरू केली आहे. त्यातून महसूल वाढण्याची मेटाला अपेक्षा आहे.









