Siddaramaiah Steps Down D. K. Shivakumar Becomes Karnataka CM – कर्नाटकात प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता आहे आणि प्रदीर्घ काळ काँग्रेसचे सिद्धरमय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्रिपदावर राहिले आहेत. मात्र कर्नाटकात काँग्रेसचेच दुसरे नेते डी.के. शिवकुमार यांचीही तितकीच ताकद आहे. अर्थातच शिवकुमार यांनाही मुख्यमंत्रिपदाची आशा होती. मात्र सिद्धरमय्या हे पद सोडायला तयार नव्हते. आज अखेर सिद्धरमय्या पायउतार झाले आणि डी.के. शिवकुमार हे येत्या दोन दिवसांतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
काँग्रेससाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. याचे कारण कोणतेही नाराजीनाट्य न होता दोन प्रभावी नेत्यांची महत्त्वाकांक्षा सांभाळत काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्यात यश मिळविले आहे. याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना दिले जाते. काँग्रेसच्या वयोवृद्ध नेत्यांना बाजूला सारून नव्या दमाच्या नेत्यांना पदावर बसविण्याचा हट्ट राहुल गांधी यांनी धरला आहे.
सिद्धरमय्या हे ओबीसी नेते आहेत. शिवाय सर्वाधिक काळ ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत. त्यामुळे त्यांना पद सोडण्यास सांगणे कठीण होते. त्याचवेळी डी. के. शिवकुमार यांचीही ताकद मोठी आहे. काँग्रेस पक्षात त्यांना संकटविमोचक म्हणून ओळखले जाते. काँग्रेसचे कोणत्याही राज्यातील सरकार अडचणीत आले तर काँग्रेसच्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेणे आणि त्यांना योग्यवेळी मतदानासाठी आणणे या सर्व जबाबदाऱ्या डी.के. शिवकुमार लिलया पेलत असत. त्यांची आर्थिक ताकद हा चर्चेचा विषय आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते.
मात्र सिद्धरमय्या हटण्यास तयार नव्हते. अखेर राहुल गांधी यांनी अल्टीमेटम दिला आणि नाराजीने का होईना सिद्धरमय्या यांनी मान्यता दिली. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला. यानुसार गेल्यावर्षीच शिवकुमार मुख्यमंत्री बनणे अपेक्षित होते. मात्र मी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेला नेता असावा म्हणून मला एक वर्षाची आणखी मुदत द्या, अशी विनंती सिद्धरमय्या यांनी केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आज अखेर सिद्धरमय्या पायउतार झाले.
त्यांचे पुत्र यतिंद्र हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री राहिले नसले तरी ते पूर्ण कार्यकाळ कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी आपल्या कामकाजात कधीही सिद्धरमय्या यांना आडकाठी केली नाही. त्यांच्या विरोधात जाहीरपणे कधीही वक्तव्य केले नाही. पक्ष फोडण्याचा प्रत्यक्ष प्रयत्नही केला नाही. त्यांनी सतत सिद्धरमय्या यांना सन्मान दिला. इतर राज्यात असे उदाहरण पाहायला मिळत नाही. आज अखेर शिवकुमार यांना त्यांच्या संयमाचे फळ मिळाले. सिद्धरमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पायउतार होणार असल्याचे जाहीर केले. हे सर्व सुरू असताना कर्नाटकच्या राज्यपालांनी त्यातही गोंधळ घातला.
आज सिद्धरमय्या हे राज्यपालांकडे राजीनामा पत्र सोपविणार आहेत. हे माहीत असताना कर्नाटकचे राज्यपाल आधी महाराष्ट्रात आणि नंतर इंदूरला निघून गेले. ते कर्नाटकात थांबलेच नाहीत. यामुळे सिद्धरमय्या यांनी सचिवांकडे राजीनामा सोपविला. परंतु सचिवांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. यामुळे राज्यपाल जेव्हा कर्नाटकात परत येतील तेव्हाच मुख्यमंत्रिपदाचा बदल प्रत्यक्षात येणार आहे.









