Home / महाराष्ट्र / Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं जोरदार लॉबिंग! इतरांची मुलं चालतात, मग माझ्या पुतण्यालाच विरोध का? मंत्रिपदासाठी छगन भुजबळ आक्रमक

Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं जोरदार लॉबिंग! इतरांची मुलं चालतात, मग माझ्या पुतण्यालाच विरोध का? मंत्रिपदासाठी छगन भुजबळ आक्रमक

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी...

By: Team Navakal
Chhagan Bhujbal 
Social + WhatsApp CTA

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आपली निवड व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे विशेष प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर या रिक्त जागेवर पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याविषयी राजकीय क्षेत्रात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. छगन भुजबळ यांनी अद्याप राज्यसभा खासदार होण्याची आपली इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली नसली, तरी पक्षांतर्गत पातळीवर आणि पडद्यामागून या जागेसाठी त्यांचे जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे खात्रीलायक समजते.

इतकेच नव्हे तर, स्वतः दिल्लीच्या राजकारणात जात असताना, आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठीही छगन भुजबळ कमालीचे आग्रही असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. भुजबळ यांच्या या दुहेरी मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

घराणेशाहीच्या आरोपांवर समर्थक नेत्याचा सवाल-
छगन भुजबळ यांच्या या राजकीय भूमिकेवर पक्षात आणि विरोधकांकडून ‘राजकीय घराणेशाही’चा आरोप केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यावर भुजबळ समर्थक एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर अत्यंत मार्मिक आणि रोखठोक विश्लेषण केले आहे.

त्यांच्या मते, जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले आणि त्यांच्या पुतण्याला राज्यात मंत्रीपद मिळाले, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल. कारण पक्षात यापूर्वीही असे निर्णय झाले आहेत. राज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना खासदारकी देण्यात आली होती. तसेच सुनील तटकरे खासदार असताना त्यांच्या कन्येला (अदिती तटकरे) राज्यात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. जर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कुटुंबात आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत हे नियम लागू होतात, तर मग छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्याच्या बाबतीत हेच सूत्र का वापरले जाऊ नये? असा रोकडा सवाल या समर्थकाने उपस्थित केला आहे. मात्र, राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता या नेत्याने जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला आहे.

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील मतभेद-
या संपूर्ण घडामोडींमागे पक्षांतर्गत असलेले जुने मतभेद आणि राजकीय समीकरणे कारणीभूत असल्याचे बोलले जाते. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसींचे हक्क अबाधित राखण्यासाठी अत्यंत आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली होती. मराठा आंदोलनाविरोधात ओबीसी समाजाचा मुख्य चेहरा म्हणून ठामपणे उभे राहणारे भुजबळ हेच प्रमुख नेते होते.

मात्र, भुजबळ यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज झाला आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत पक्षाला बसला, असा एक मतप्रवाह पक्षात तयार झाला होता. खुद्द अजित पवार यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “काही नेते विशिष्ट जातीच्या मुद्द्यावर अत्यंत टोकाची भूमिका घेतात, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते आणि संपूर्ण पक्षाला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागते,” अशा शब्दांत अजित पवारांनी भुजबळांचे नाव न घेता टोला लगावला होता. तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये काहीसे वितुष्ट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या