Don 3 : सध्या बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या आगामी ‘डॉन ३’ (Don 3) या चित्रपटाची आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच, मुख्य भूमिकेसाठी निवडलेल्या रणवीर सिंहने (Ranveer Singh) या चित्रपटातून अचानक माघार घेतली. रणवीरच्या या तडकाफडकी निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली असून, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
रणवीरच्या या निर्णयामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे फरहान अख्तर आणि त्यांचे सहनिर्माते रितेश सिधवानी हे रणवीर सिंहकडे आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करत असल्याचे वृत्त आहे; परंतु रणवीरने ही मागणी फेटाळून लावल्यामुळे दोन्ही बाजूंमधील तणाव आणखी वाढला आहे. याच दरम्यान, चित्रपटसृष्टीतील मध्यवर्ती संघटना ‘FWICE’ कडून रणवीर सिंहवर बंदी घालण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले. या घडामोडींमुळे रणवीरच्या आगामी चित्रपटांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौफेर टीकेमुळे हा वाद अधिकच चिघळला आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सलमान खानने रणवीर आणि फरहान यांच्यातील हा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सलमान खानचे रणवीर सिंहशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत, तर दुसरीकडे फरहान अख्तर यांच्या कुटुंबाशीही त्याचे जुने आणि कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. याच संबंधांचा वापर करून सलमानने या दोघांशीही वैयक्तिकरित्या दूरध्वनीवरून संवाद साधला आहे.
सलमानने दोघांनाही जाहीर तमाशा न करता, आपापले मुद्दे शांतपणे मांडून हा वाद आपापसात मिटवण्याचा सल्ला दिला आहे. फरहानशी चर्चा करताना सलमानने स्पष्ट केले की, चित्रपटसृष्टीत सर्जनशील मतभेद (Creative Differences) असणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. तसेच त्याने रणवीरचे म्हणणेही सविस्तरपणे ऐकून घेतले आहे.









