Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या पावसाळ्याबाबत नवा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार केरळमध्ये मान्सून कधी धडकणार, याची निश्चित तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार, आगामी काळात नागरिकांची पावसाची प्रतीक्षा काहीशी लांबण्याची शक्यता आहे. येत्या ११ जूनपर्यंत महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागांसह राज्याच्या अंतर्गत भागांत अत्यंत अल्प पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत देशातील बहुतांश राज्यांमध्येही पावसाची गती मंदावलेली असेल. दरम्यान, मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख दरवर्षी ११ जून मानली जाते, त्यामुळे मुंबईकरांना तोपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पावसाचा प्रादेशिक अंदाज-
अधिकच्या माहितीनुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या टप्प्यांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
४ जूनपर्यंतची स्थिती: महाराष्ट्रातील किनारपट्टीचा भाग (कोकण) आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत काही ठिकाणी दररोज १० मिलीमीटर इतका अत्यंत तुरळक आणि हलका पाऊस पडू शकतो.
४ ते ११ जूनचा कालावधी: या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याच काळात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये पुढे सरकतील. परिणामी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची व्याप्ती वाढून हवामानात बदल होईल. तसेच ४ ते ११ जून दरम्यान कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विजांचा कडकडाट: ३१ मे ते ३ जून या दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा-
एकीकडे मान्सूनची गती संथ असतानाच, दुसरीकडे स्थानिक हवामान बदलांमुळे हवामान विभागाने आज (शुक्रवार, २९ मे) देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.
या उत्तर आणि मध्य भारतीय प्रदेशांमध्ये ताशी ९० किलोमीटरच्या अत्यंत वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. या अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.
तापमानात घट आणि पुढील अंदाज-
हवामान खात्याच्या माहितीनुसार, २९ ते ३१ मे दरम्यान उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे पुढील काही दिवसांत वायव्य भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाईल. याशिवाय, पुढील २ ते ३ दिवसांत ईशान्य (North-East) आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.









