Commercial gas cylinder : मे महिन्यात पेट्रोल-डिझेलची चार वेळा आणि सीएनजीची तीन वेळा दरवाढ झाल्यानंतर आज जूनच्या पहिल्याच दिवशी तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर 42 ते 53 रुपयांनी महागले आहेत. तर 5 किलोच्या व्यावसायिक किमतीत 11 रुपयांची वाढ झाली आहे. हे सुधारित दर आजपासून देशभरात लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी जानेवारीपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात केलेली ही सातवी दरवाढ आहे. आखाती युद्धामुळे एका बाजूला एलपीजीचा तुटवडा असताना नवी भाववाढ झाल्याने खाद्यपदार्थांचे आधीच वाढलेले दर आता पुन्हा वाढणार आहेत.
दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आधी 3071.50 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 3113.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडर दरात 43.50 रुपयांची वाढ होऊन तो 3,067.50 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात सर्वाधिक म्हणजेच 53.50 रुपयांची वाढ झाली आहे. तिथे या सिलिंडरची किंमत 3202 रुपयांवरून 3255.50 रुपयांवर गेली आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि स्थलांतरित मजूर ज्या 5 किलोच्या छोट्या सिलिंडरचा वापर करतात त्यांनाही या महागाईतून सुटका मिळालेली नाही. तेल कंपन्यांनी 5 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत 11 रुपयांची वाढ केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये होत असलेल्या सततच्या वाढीमुळे, 19 किलोच्या सिलिंडरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये या सिलिंडरची किंमत 1,580.50 रुपये इतकी होती. त्यात जानेवारी महिन्यात 11 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, पुन्हा मार्चमध्ये 114.5 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये वाढ झाली आहे. सततची भाववाढ आणि आखाती युद्धानंतर निर्माण झालेल्या टंचाईमुळे खाद्यपदार्थांचे भावही गेले काही दिवस वाढत आहेत.
20 रुपयांना मिळणारा वडापाव गेल्या महिन्यात 25 ते 30 रुपयांवर गेला होता. आता खाद्यपदार्थांचे भाव आणखी वाढू शकतात. गॅस दरवाढीमुळे गेल्या महिन्यात पावाचाही भाव वाढला आहे.सर्वसामान्य कुटुंबांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, दररोज स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आखाती युद्ध लांबल्यास घरगुती सिलिंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमने 77,821 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. मात्र, आखाती युद्धामुळे सरकारी तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटींचा तोटा होत होता. 4 वेळच्या दरवाढीनंतर हा तोटा कमी झाला आहे. काल पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, हा तोटा आता दररोज अंदाजे 750 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे.









