Amivantemab injection : कर्करोगाच्या काही रुग्णांमध्ये असा एक टप्पा येतो की, ज्या टप्प्यावर कर्करोगावर जगभरात सध्या उपलध असलेले कोणतेही औषध किंवा आधुनिक उपचार पद्धती कुचकामी ठरतात. अशा रुग्णांवर ॲमिव्हॅनटेमॅब हे इंजेक्शन अत्यंत प्रभावी ठरते, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या चाचणीतून काढण्यात आला आहे. या चाचणीत 11 देशांमधील अशा कर्करुग्णांचा सहभाग होता ज्यांना पुन्हा कर्करोगाने ग्रासले होते आणि जे कोणत्याही औषधाला किंवा उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. हे औषध त्यांच्यासाठी अमृत ठरणार आहे.
कर्करोग बरा झाल्यानंतर तो पुन्हा झालेल्या रुग्णांना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने विकसित केलेले ॲमिव्हॅनटेमॅब हे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्यातील तीनपैकी एका रुग्णाच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठी आकसून कमी झाल्या. तर 15 रुग्णांमध्ये त्या आश्चर्यकारकरित्या पूर्णपणे नष्ट झाल्याचे आढळून आले. अशाच प्रकारचे निष्कर्ष फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांमध्येही दिसून आले, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कर्करोगावर केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी या दोन्ही उपचारपध्दती निष्प्रभ ठरतात. अशा रुग्णांमध्ये ॲमिव्हॅनटेमॅबने दाखवलेला परिणाम थक्क करणारा आहे, असे लंडनच्या ‘इंस्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च’ (आयसीआर) या संस्थेमधील जागतिक लॉजिकल कॅन्सर थेरपीज या विषयाचे प्राध्यापक डॉ. केव्हिन हॅरिंग्टन यांनी सांगितले आहे.
ज्या रुग्णांमध्ये उपचार करण्याचे पर्याय अत्यंत मर्यादित असतात अशा रुग्णांमध्ये ॲमिव्हॅनटेमॅबने दाखवलेला प्रभाव भविष्यातील उपचार पध्दतींसाठी महत्त्वपूर्ण आहे. ही उपचारपध्दती दरवर्षी हजारो रुग्णांसाठी लाभदायक ठरू शकते, असे डॉ. हॅरिंग्टन यांनी म्हटले आहे. शिकागो येथील अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (ॲस्को) परिषदेत नुकतेच हे संशोधन सादर करण्यात आले. ही कर्करोगावरील जगातील सर्वात प्रतिष्ठित परिषद मानली जाते. ॲमिव्हॅनटेमॅब या औषधाच्या सध्या विविध प्रकारच्या कर्करोगांवर 60 हून अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. मेंदूचा कर्करोग, मोठ्या आतड्यांचा कर्करोग (कोलोरेक्टल कॅन्सर) आदी प्रकारच्या कर्करोगांचा यामध्ये समावेश आहे. जगभरात कर्करोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर हे प्रमुख कारण असते. कोलोरेक्टल कॅन्सरचे जर वेळीच निदान झाले तर ते पूर्णपणे बरा होऊ शकतो किंवा त्याला आळा घालता येतो.
ॲमिव्हॅनटेमॅब हे औषध कर्करोगावर तीन प्रकारे मात करते. सर्वप्रथम हे औषध कर्करोगाच्या गाठी वाढण्यास मदत करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनाला (ईजीएफआर) अटकाव करते. त्याचप्रमाणे कर्करोगाच्या पेशी औषधाचा प्रभाव टाळण्यासाठी ज्या मार्गाचा वापर करतात, तो मार्गच या औषधामुळे रोखला जातो. औषधाचा तिसरा गुण म्हणजे या औषधामुळे कर्करोगाच्या गाठींचा प्रतिकार करण्यासाठी रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
या औषधाचा लाभ झालेल्या पहिल्या रुग्णाचे नाव कार्ल वॉल्श आहे. 56 वर्षे वयाच्या वॉल्श यांना जिभेचा कर्करोग झाला होता. जुलै 2025 मध्ये वॉल्श या औषधाच्या चाचणीमध्ये सहभागी झाले होते.
वॉल्श यांच्यावर त्याआधी केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचे उपचार करण्यात आले होते. मात्र या दोन्ही उपचारपध्दती वॉल्श यांच्या बाबतीत कुचकामी ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांना चाचणीमध्ये सहभागी होण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला. सध्या त्यांना औषधाची 17 वी मात्रा देण्यात आली आहे आणि त्यांच्यामध्ये आमूलाग्र सुधारणा झाली आहे.









