Meghablock : मध्य रेल्वेने मुंबईहून उत्तर आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते इगतपुरी या मुख्य रेल्वे मार्गावर आगामी ६ जून रोजी तब्बल १३ तासांचा विशेष वाहतूक आणि विद्युत खंड (ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक) घेण्यात येणार आहे. या प्रदीर्घ ब्लॉकमुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या जलद तसेच अतिजलद (एक्स्प्रेस) गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्यांचा प्रवास त्यांच्या नियोजित अंतिम स्थानकापूर्वीच मर्यादित केला जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाने या महाब्लॉकचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, ६ जून रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून सुरू होणारा हा ब्लॉक दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जून रोजी पहाटे ३:०० वाजेपर्यंत सलग १३ तास सुरू राहणार आहे. मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या ‘आठगाव’ रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी हे तांत्रिक काम हाती घेण्यात येत आहे. ही प्रणाली रेल्वेच्या सुरक्षित आणि गतिमान प्रवासासाठी अत्यंत आवश्यक असल्याने रेल्वे प्रशासनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या कामाचा थेट फटका कसारा, इगतपुरी, नाशिक रोड तसेच यापुढील स्थानकांकडे जाणाऱ्या आणि तिथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
प्रवाशांची अचानक होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडू नये म्हणून प्रशासनाने काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या आहेत, तर काही गाड्यांचा प्रवास पूर्व नियोजित स्थानकाऐवजी अर्ध्यावरच (शॉर्ट टर्मिनेट) संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांची लाडकी मानली जाणारी गाडी क्रमांक १२१०९ सीएसएमटी–मनमाड पंचवटी एक्स्प्रेस आणि परतीच्या प्रवासातील गाडी क्रमांक १२११० मनमाड–सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यासोबतच, गाडी क्रमांक ११०११ सीएसएमटी–धुळे एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ११०१२ धुळे–सीएसएमटी एक्स्प्रेस या गाड्याही ६ जून रोजी धावणार नाहीत..









