Vikram Kakade : भाजपातून राष्ट्रवादी अजित पवार गटात येऊन तात्काळ पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लढविणारे संजय काकडे यांचे पुत्र विक्रम संजय काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची माहिती उघडकीस आली आहे. सुमारे 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असलेल्या विक्रम काकडे यांनी विविध व्यक्ती आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले असून, त्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांना दिलेल्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाची विशेष चर्चा सुरू झाली आहे.
विक्रम काकडे यांनी मात्र हे कर्ज नसल्याचे म्हटले आहे. विक्रम काकडे म्हणाले की, हे कर्ज नव्हे तर अॅडव्हान्स आहे. आमच्या शेजारचा प्लॉट आम्हाला घ्यायचा होता तो जय पवार यांचा आहे. त्या प्लॉटच्या खरेदीसाठी गेल्या वर्षी हा अॅडव्हान्स मी दिला होता. त्यांचे हे विधान आणि पक्ष प्रवेश करताच मिळालेली आमदारकीची उमेदवारी यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे.
काकडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, जय पवार यांच्याशिवाय परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाख रुपये तसेच रुस्तुम भरोचा, श्रीशा एंटरप्रायझेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स आणि राज डेव्हलपर्स यांसारख्या व्यक्ती व कंपन्यांना मिळून सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. काकडे यांच्या एकूण मालमत्तेमध्ये बँक ठेवी, शेअर, विमा व पोस्टातील गुंतवणूक, 410 ग्रॅम सोने, पाच किलोहून अधिक चांदी, घड्याळे, मोटारगाड्या आणि आलिशान बोटींचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात त्यांनी 15 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
त्यांच्या नावावर साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम असून विविध बँक खात्यांमध्ये 29 लाख 53 हजार 629 रुपये जमा आहेत. काकडे यांच्यावर 41 कोटी 80 लाख 27 हजार 761 रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 50 लाख रुपये किमतीची परवानाधारक हत्यारे आहेत. त्यांची जंगम मालमत्ता 78 कोटी 95 लाख 65 हजार 531 रुपयांची आहे. स्थावर मालमत्तेमध्ये मावळ तालुक्यातील दोन ठिकाणच्या जमिनी, मुंढवा येथील मालमत्ता, पाषाण परिसरातील 4,544 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका आणि दुबईतील आलिशान सदनिकेचा समावेश आहे. पाषाण येथील त्याच आकाराची आणखी एक सदनिका त्यांनी पत्नी देविका काकडे यांना भेटस्वरूप दिली आहे.









