Cockroach Janta Party Demands: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळा आणि सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांमधील सावळागोंधळ यांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये सध्या प्रचंड असंतोष आहे. याच मुद्द्यावरून पुण्यात तरुण आणि विद्यार्थ्यांचा एक मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला. या संपूर्ण परीक्षांमधील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने पुण्यात एक मोठे जनआंदोलन छेडण्यात आले.
या निषेध सभेला केवळ तरुणच नाही, तर अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी हैदराबाद विद्यापीठातील दिवंगत विद्यार्थी रोहित वेमुला याला उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे श्रद्धांजली वाहिली.
आंदोलनात नामवंत व्यक्तींची उपस्थिती
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचा आवाज बुलंद करणाऱ्या आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणाऱ्या या आंदोलनात विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रख्यात समाजसेवक सोनम वांगचूक आणि या संपूर्ण चळवळीचे मुख्य समन्वयक अभिजित दीपके प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी ५ मोठ्या मागण्या
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाकडे खालील ५ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे:
- आर्थिक नुकसानभरपाई: जर एखाद्या परीक्षेचा पेपर फुटला, तर त्याचा फटका बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारने 10,000 रुपये नुकसानभरपाई दिली पाहिजे.
- टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे ऑडिट: परीक्षा आयोजित करण्याचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट व्हावे. मंत्र्यांच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या मित्रांना अशी टेंडर्स दिली जाऊ नयेत.
- निकालाची मुदत: परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यासाठी एक निश्चित आणि कडक कालमर्यादा आखली पाहिजे.
- प्रवास खर्च: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी लागणारा वाहतुकीचा संपूर्ण खर्च शासनाने उचलला पाहिजे.
- छत्रपती शिवरायांचा इतिहास: एनसीईआरटीच्या (NCERT) अभ्यासक्रमातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये पुन्हा सन्मानाने समाविष्ट करण्यात यावा.
धार्मिक राजकारणाला तरुणाई बळी पडणार नाही
या आंदोलनादरम्यान देशातील सद्य राजकीय परिस्थितीवरही भाष्य करण्यात आले. देशातील तरुण पिढी आता कोणत्याही प्रकारच्या हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारने अशा प्रकारचे राजकारण आता थांबवावे, असा इशाराही कॉकरोच जनता पार्टीने दिला.
बंडखोर नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
आंदोलनाचे समन्वयक अभिजीत दीपके यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “आमच्यावर समाजात अराजकता पसरवल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, स्वतःच्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता आहे का? आम्हाला संविधान समजत नाही, असा आरोप करणाऱ्यांना मला उलट विचारायचे आहे की, रात्रीच्या अंधारात चोरून पहाटेचा शपथविधी घेणे कोणत्या संविधानात बसते, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.”









