Pranit More Controversy : इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अत्यंत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे बिग बॉस फेम कॉमेडियन प्रणित मोरे आणि त्याच्या शोमधील प्रेक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे, हिमांशू जांगडा, डॉक्टर सेजल पवार आणि इतर काही जणांविरोधात अधिकृतपणे गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील नोडल सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कडक कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावर या शोचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या तीव्र विरोधानंतर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
Pranit More Controversy : कायद्याची ‘ही’ कडक कलमे लावली
सायबर पोलिसांनी आरोपींवर कायद्याचा बडगा उगारत खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे:
- भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम 75(1)(iv), 75(3), 294 आणि 353(2).
- माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) 2000 चे संबंधित कायदेशीर नियम.
Pranit More Controversy : नेमका कोणत्या व्हिडिओंमुळे पेटला वाद?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित मोरेच्या एका शो दरम्यान रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात पसरवले गेले होते. या व्हिडिओंमध्ये महिला, त्यांची संमती आणि मृतदेहांबद्दल अत्यंत अशोभनीय आणि आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या होत्या, ज्या सामाजिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत:
- महिलांचा अवमान आणि बिर्याणी वाद: तपासादरम्यान सायबर सेलला आढळले की, हिमांशू जांगडा याने डेटवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात शारीरिक संबंधांचा अधिकार असल्यासारखे वक्तव्य केले होते. हे विधान महिलांचा अवमान करणारे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारे आहे.
- वैद्यकीय मृतदेहांची विटंबना: दुसऱ्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये डॉक्टर सेजल पवार हिने वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयात आणल्या जाणाऱ्या पुरुषांच्या मृतदेहांबद्दल अत्यंत अमर्याद आणि लज्जास्पद टिप्पणी केली होती. हे कृत्य मृत व्यक्तीच्या आदराच्या आणि सार्वजनिक नैतिकतेच्या पूर्णपणे विरोधात आहे.
Pranit More Controversy : पैसे कमवण्यासाठी अश्लीलतेचा वापर केल्याचा आरोप
सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी असाही आरोप केला आहे की, हा आक्षेपार्ह मजकूर केवळ योगायोगाने समोर आलेला नाही. तर व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि ऑनलाईन माध्यमातून जास्त पैसे (मोनेटायझेशन) कमवण्यासाठी प्रणीत मोरेच्या शोचा भाग म्हणून जाणीवपूर्वक रेकॉर्ड केला गेला, त्याला प्रोत्साहन दिले गेले आणि इंटरनेटवर सर्वत्र पसरवले गेले.
Pranit More Controversy : पोलीस चौकशी सुरू; तिघांनाही समन्स जारी
गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. पोलिसांनी प्रणीत मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉक्टर सेजल पवार या तिघांनाही अधिकृत समन्स बजावले आहे. त्यांना सायबर सेलसमोर हजर राहून आपले जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.









