Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीसाठी रवाना होत असताना त्यांच्या चार्टर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच वैमानिकाच्या ही बाब लक्षात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. मात्र धक्कादायक बाब अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या चार्टर विमानानेच सुनेत्रा पवार यांनी हा प्रवास केला, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, त्यानंतर असा खुलासा करण्यात आला की, संबंधित विमान व्हीएसआर कंपनीचे नसून सीएमआर कंपनीचे होते. तरीही व्हीएसआरच्या विमानानेच त्यांनी प्रवास केल्याचा दावा होत राहिल्याने त्यांचे विमान व्हीएसआर कंपनीचे होते की सीएमआरचे होते हा प्रश्न कायम राहिला आहे. ज्या कंपनीवर रोहित पवार सतत आरोप करीत आहेत त्या विमानाने सुनेत्रा पवार कशा गेल्या हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
9 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या खासगी विमानाने मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र, ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. या तांत्रिक बिघाडामुळे विमान तब्बल 2 तास मुंबई विमानतळावरच थांबवून ठेवावे लागले. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर हे विमान दोन तास उशिराने म्हणजेच रात्री 7 वाजता दिल्लीसाठी रवाना झाले. या विमानामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार व खासदार सुनील तटकरे हेदेखील प्रवास करत होते.
बिघाड झालेले खाजगी विमान हे व्हीएसआर कंपनीचे असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळाने राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले की ते विमान ‘सीएमआर’ कंपनीचे होते. ते व्हीएसआर कंपनीचे नव्हते. सीएमआर ही आंध्र प्रदेशातील भाजपा खासदार सी. एम. रमेश यांच्या मालकीची कंपनी आहे. राष्ट्रवादीचा खुलासा झाल्यानंतरही त्या व्हीएसआर कंपनीच्या विमानाने गेल्याची चर्चा सुरूच राहिली.
या घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना गोलमाल उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुनेत्रा वहिनी खरंच व्हीएसआर विमानाने गेल्या होत्या की नाही, याची मला पूर्ण माहिती नाही. पण जर असे झाले असेल आणि विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल, तर तो अत्यंत चिंताजनक विषय आहे. मी नेहमीच प्रवासाच्या साधनांच्या सुरक्षेबद्दल संसदेत सातत्याने आवाज उठवत असते. त्यामुळे मला वहिनींची आणि सोबत असलेल्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
व्हीएसआर कंपनीबद्दल आरोप-प्रत्यारोप होत राहतात. पण दोन-तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. सुनेत्रा वहिनी खरेच त्या विमानाने गेल्यात की नाही मला माहिती नाही. कारण पंतप्रधान मोदींनी काटकसरीचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही खासगी विमानाने किंवा हेलिकॉप्टर प्रवासासाठी वापरते की नाही याची माहिती नाही. खासगी विमान, हेलिकॉप्टर यांच्या मेन्टेनन्ससाठी वारंवार तपासणी करणे आवश्यक असते. अजितदादांच्या ज्याप्रकारे अपघात झाला, त्याची अनेक उत्तरे अजुनही आमच्याकडे नाहीत. एक बहीण म्हणून त्यांची उत्तरे मला हवी आहेत. आज नाही उद्या, पण उत्तरे मिळायला हवीत. ही उत्तरे आम्ही संसदेत नेहमी मागतो. कारण अजितदादा माझा फक्त भाऊ नव्हता, तर या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. विमानाच्या मेन्टेनन्सचा प्रॉब्लेम होता का? असेल तर त्याला जबाबदार कोण? आज माझा भाऊ गेला, उद्या दुसर्या कुणाच्या घरावर असा दिवस येऊ नये.
अजित पवार यांच्या अपघातानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ‘व्हीएसआर’ कंपनीवर अनेक आरोप सतत केले आहेत. या कंपनीविरोधात अनेक पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी मोहीमच सुरू केली आहे . महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी व्हीएसआरच्या विमानांचा वापर टाळावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले होते. मात्र, या आवाहनानंतरही अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही एप्रिल महिन्यात मुंबई ते पुणे प्रवास याच विमानाने केला होता. आता त्याच कंपनीच्या विमानाने सुनेत्रा पवार यांनी प्रवास केला असल्यास ते धक्कदायक आहे.या प्रवासाबाबत आणखी एक वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी इंधन काटकसरीचा संदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस याच एनडीएच्या बैठकीला इंडिगोच्या विमानाने इतर प्रवाशांसह दिल्लीला गेले. सुनेत्रा पवार या मात्र खाजगी विमानाने गेल्या.
अजित पवार अपघात अहवाल
रोहित पवार पुन्हा आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवालावरून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आज पुन्हा सत्ताधार्यांसह विरोधकांवरही टीकेची झोड उठवली आहे. रोहित पवार यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत आली आहेत. नियमानुसार अशा दुर्घटनांचा अंतिम तपास अहवाल एका वर्षाच्या आत सादर करणे अपेक्षित असते. मात्र अद्यापही अंतिम अहवाल समोर आलेला नाही. विमान अपघात तपास यंत्रणा तपास हा तांत्रिक स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये गुन्हेगारी तपासाचा समावेश नसतो. असे असतानाही अहवाल वेळेवर येत नाहीत, हे सर्वांनाच माहिती आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये ’अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया’, असे सांगणार्यांवर त्यांनी थेट हल्ला चढवला.ते म्हणाले की, अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक ’सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमकहराम आणि कृतघ्न’ आहेत. फक्त सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी काही लोक अशा प्रकारची भूमिका घेतात. मैत्री, नातीगोती आणि संबंध याबद्दल अनेकजण व्यासपीठावर बोलतात. पण प्रत्यक्षात त्याचे काहीच महत्त्व नसते का? त्यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्याशी राजकीय जवळीक दाखवणार्या, पण त्यांच्या विमान अपघात प्रकरणात ठोस भूमिका न घेणार्या नेत्यांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.










