Monsoon Update: देशात एकीकडे मान्सूनचे आगमन झाले असतानाच दुसरीकडे चिंतेची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ची स्थिती अधिकृतपणे निर्माण झाल्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर सध्या सुरू असलेल्या नैऋत्य मान्सूनच्या काळात हा अल निनो आणखी मजबूत आणि तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून 2026 च्या ताज्या हवामान बुलेटिननुसार, पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वेगाने वाढले असून त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. समुद्राच्या या उष्णतेचा परिणाम आता वातावरणावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे, म्हणजेच अल निनो आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे.
तापमानाचा पारा वाढला; काय सांगतात आकडे?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकेल तसा अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होत जाईल:
- सूचकांक पार: समुद्राच्या तापमानाचा अंदाज लावणारा मुख्य ‘निनो 3.4’ हा निर्देशांक आता +0.5°C च्या वर गेला आहे. यामुळेच अल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत मोहीम सुरू झाली आहे.
- समुद्राखालील हालचाली: पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाखाली देखील प्रचंड उष्णता साचली आहे. ही गरम पाणी आगामी काही महिन्यांत वरच्या थरावर येईल आणि अल निनोला अधिक घातक बनवेल.
- भविष्यातील अंदाज: जुलै महिन्यापासून मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरात ही उष्णता आणखी वाढेल. यामुळे मान्सूनच्या काळात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा अल निनो पाहायला मिळू शकतो.
भारतासाठी अल निनो का ठरतो धोकादायक?
अल निनो ही एक नैसर्गिक हवामान प्रणाली आहे, ज्याचा थेट संबंध समुद्राचे तापमान वाढण्याशी असतो. भारताचा इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा अल निनो सक्रिय होतो, तेव्हा त्याचे खालील गंभीर परिणाम देशावर होतात:
- मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी पडतो.
- कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो.
- पावसाळ्यात मोठे कोरडे खंड पडतात, ज्यामुळे काही भागांत दुष्काळाचा धोका निर्माण होतो.
जपानच्या हवामान खात्याने दिली आशेचा किरण
अल निनो जरी सक्रिय झाला असला तरी मान्सूनवर परिणाम करणारा हा एकमेव घटक नाही. सध्या हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) तटस्थ म्हणजेच न्यूट्रल आहे. मात्र, जपानच्या हवामान संस्थेने (JMA) 11 जून रोजी एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे.
जपानच्या तज्ज्ञांनुसार, जुलै महिन्याच्या आसपास हिंदी महासागरात ‘पॉझिटिव्ह आयओडी’ (Positive IOD) तयार होण्याची शक्यता आहे. जर असे झाले, तर हा पॉझिटिव्ह आयओडी अल निनोच्या घातक प्रभावाला बऱ्याच अंशी कमी करेल आणि भारताला मोठ्या दुष्काळापासून वाचवू शकेल. भारतीय हवामान खाते आता या संपूर्ण स्थितीवर दरमहा बारीक लक्ष ठेवून असणार आहे.










