El Nino: प्रशांत महासागराच्या वाढलेल्या तापमानामुळे निसर्गाचा अनाकलनीय हवामान घटक असलेला एल निनो सक्रिय झाला आहे. यंदा तो ऐतिहासिक पातळीवर तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. भारतातही याचा परिणाम होऊन तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार यंदाचा एल निनो 1997 मधील विक्रमी एल निनोच्या बरोबरीचा किंवा त्याहून अधिक तीव्र असू शकतो. 1997 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे उष्णतेच्या तीव्र लाटा, पूर, दुष्काळ, चक्रीवादळे आणि वणवे अशी नैसर्गिक संकटे ओढवली होती. या नैसर्गिक संकटांमुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले होते.अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने एल निनो सक्रिय झाल्याच्या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. एल निनो म्हणजे विषुववृत्ताजवळ प्रशांत महासागराचे पाणी गरम होणे. ज्याचा जगभरातील हवामानाच्या चक्रावर परिणाम होतो. यंदा शरद ऋतुच्या उत्तरार्धात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला एल निनो एवढा तीव्र होईल की, 1950 पासूनच्या ऐतिहासिक नोंदींनुसार तो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एल निनो घटनांपैकी एक ठरेल, अशी घोषणा नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने केली आहे.
क्लार्क विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ एबी फ्रेझियर सांगतात की, एल निनोमुळे समुद्रात खोलवरून उष्ण पाण्याचे लोट पृष्ठभागाजवळ येतात. त्यामुळे हवामानाच्या रचनेवर प्रतिकूल परिणाम होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये त्यामुळे तीव्र स्वरुपाच्या हवामान बदलाशी संबंधित घटना घडतात.यंदाच्या एल निनोमुळे भारतात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाला दुष्काळ, वणवे आणि कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले की, यंदा दुष्काळाचा अंदाज असल्याने तयारी केली आहे. समिती लक्ष ठेवून आहे. शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये.
महाराष्ट्रात दुष्काळ नाही
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख महाराष्ट्राबद्दल सांगताना म्हणाले की, 13 जून नंतर पाऊस सुरू होईल. 13 जून ते 19 जून दिवसाआड पाऊस राहील. यंदा पाऊस तीन टप्प्यांत येणार आहे. 20 ते 30 जून पुन्हा पाऊस येईल. पण तो नागपूर, कर्नाटककडून येईल. त्यानंतर तिसर्या टप्प्यात 10 ते 15 जुलै पाऊस येईल. पण जमिनीत वीतभर ओल गेल्यानंतरच पेरणी करा. 11 जूनला सूर्याला खळ पडला तर दुष्काळ येतो. पण आज खळ पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळ पडणार नाही. फक्त तीन टप्प्यांत पाऊस पडेल. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालेल.










