Home / लेख / Madhur Virli Controversy: प्रणित मोरेनंतर आणखी एका कॉमेडियनचा व्हिडिओ व्हायरल, बलात्काराबाबतच्या ‘त्या’ विधानावर नेटकरी संतप्त

Madhur Virli Controversy: प्रणित मोरेनंतर आणखी एका कॉमेडियनचा व्हिडिओ व्हायरल, बलात्काराबाबतच्या ‘त्या’ विधानावर नेटकरी संतप्त

Madhur Virli Controversy: कॉमेडी शोच्या आतमध्ये लोक मोठ्याने हसत होते, पण तो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला, तेव्हा...

By: Team Navakal
Madhur Virli Controversy: प्रणित मोरेनंतर आणखी एका कॉमेडियनचा व्हिडिओ व्हायरल, बलात्काराबाबतच्या 'त्या' विधानावर नेटकरी संतप्त
Social + WhatsApp CTA

Madhur Virli Controversy: कॉमेडी शोच्या आतमध्ये लोक मोठ्याने हसत होते, पण तो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला, तेव्हा मात्र लाखो लोकांचा संताप अनावर झाला. बलात्कार (Rape) हा कोणत्याही पीडितेसाठी केवळ एक शब्द नसून, आयुष्य उद्ध्वस्त करणारा एक अत्यंत क्लेशदायक आणि कधीही न भरणारा मानसिक धक्का असतो. असे असतानाही, एका जुन्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये या गंभीर विषयाची क्रूर थट्टा उडवण्यात आली आणि प्रेक्षकही त्यावर टाळ्या वाजवून हसताना दिसले.

स्टँड-अप कॉमेडियन मधुर विर्ली याच्या 2024 मधील ‘लव्ह अँड लॅटेक्स’ या शोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने बलात्काराच्या घटनांवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे, ज्यावरून आता संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कडाडून टीका होत आहे.

मधुर विर्लीच्या जोकवर नेटकरी का संतापले?

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये मधुर विर्लीने केलेल्या विधानांमुळे इंटरनेटवर संतापाची लाट उसळली आहे:

  • अतिशय संतापजनक वक्तव्य: विर्लीने जोक करताना म्हटले की, 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये केवळ बलात्कार होतो, तर एका प्रकरणात अत्याचारानंतर हत्या केली जाते. पुढे त्याने अत्यंत असंवेदनशीलपणे वर्णन केले की, अशा घटनेत पीडित मुलगी आरोपीला नंतर मिठी मारण्याबाबत (Cuddling) विचारू शकते, ज्यामुळे तो तिच्यावर वार करतो.
  • प्रेक्षकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह: नेटकऱ्यांनी केवळ या कॉमेडियनवरच नव्हे, तर तिथे बसून या भयंकर विधानावर खिदळणाऱ्या प्रेक्षकांवरही ताशेरे ओढले आहेत. एका युझरने लिहिले, “हा कोणताही हुशार विनोद नाही, ही विकृती आहे. जेव्हा अशा गोष्टींना विनोदाच्या नावाखाली सामान्य केले जाते, तेव्हा समाजाची मानसिकता हळूहळू हिंस्र बनत जाते.”

या प्रचंड विरोधामुळे दिल्लीचा राहणारा आणि इंजिनिअरिंग सोडून कॉमेडी क्षेत्रात आलेल्या मधुर विर्लीने तातडीने आपले सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट (Deactivate) केले आहेत.

प्रणित मोरेचा शोसुद्धा वादाच्या भोवऱ्यात; ‘३७० रुपयांची बिर्याणी’ व्हायरल

हा वाद सुरू असतानाच, आणखी एक सुप्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील दोन वेगवेगळ्या क्लिप्स सध्या सोशल मीडियावर वादाचा विषय ठरल्या आहेत:

  • मृतदेहांची थट्टा आणि चौकशीचे आदेश: एका व्हिडिओमध्ये केईएम (KEM) हॉस्पिटलमध्ये शिकणारी सेजल पवार नावाची वैद्यकीय विद्यार्थिनी वैद्यकीय अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांच्या (Cadavers) अवयवांवर आणि पुरुषांच्या गुप्तांगांची तुलना करण्यावर विनोद करताना दिसते. सुमारे 3 महिन्यांपूर्वीच्या या व्हिडिओवरून वैद्यकीय क्षेत्रातील मृतदेह देणगीदारांचा अपमान केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे.
  • ‘३७० रुपयांची बिर्याणी’ आणि संताप: याच शोमधील दुसऱ्या एका क्लिपमध्ये हिमांशू जांगडा नावाचा वेब डेव्हलपर त्याच्या एका डेटचा किस्सा सांगतो. तो म्हणतो की, त्याने एका मुलीसोबत चिकन बिर्याणी खाण्यासाठी 370 रुपये खर्च केले होते. नंतर मुलीने जेव्हा तिला घरी सोडण्यास सांगितले, तेव्हा त्या पैशांची ‘वसुली’ करण्याची त्याची इच्छा होती. मुलीवर पैसे खर्च केले म्हणजे तिच्या शरीरावर अधिकार मिळाला, अशा अर्थाच्या या विधानावर समाजमाध्यमांतून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

कॉमेडीची मर्यादा नक्की कुठे?

या लागोपाठ समोर आलेल्या प्रकरणांमुळे आता इंटरनेटवर ‘कॉमेडीच्या मर्यादा’ या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही संवेदनशील विषयाला, हिंसाचाराला किंवा महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या गोष्टींना विनोदाचा भाग बनवले जाऊ नये, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या