Abhijit Dipke Attack: नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी शारीरिक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या जीवघेण्या आणि भ्याड हल्ल्यानंतर अभिजित दिपके यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत विरोधकांना उत्तर दिले आहे.
दिपके म्हणाले की, “माझ्यावर एकदा नाही तर दहा वेळा हल्ला केला किंवा कानाखाली मारली तरी मी माझ्या मूळ मुद्यावरून अजिबात विचलित होणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल.”
हा केवळ भीती दाखवण्याचा आणि मूळ मुद्यावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न
हल्ल्यानंतर आपली सडेतोड भूमिका मांडताना अभिजित दिपके यांनी विरोधकांच्या भित्रेपणावर बोट ठेवले:
- भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा डाव: जयपूरमधील हे आंदोलन अत्यंत मोठे आणि शांततापूर्ण मार्गाने यशस्वी झाले होते. हे आंदोलन दाबण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला आहे.
- 1 कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान: पेपरफुटीमुळे देशातील जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून काहींनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. या पापासाठी शिक्षणमंत्र्यांनी खुर्ची सोडणे गरजेचे आहे.
- द्वेष करणाऱ्यांना ‘गेट वेल सून’ संदेश: दिपके यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना ‘गेट वेल सून’ म्हणत टोला लगावला आहे.
गांधी-आंबेडकरांचे विचार विसरणार नाही; शांततेने लढणार लढाई
दिपके यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या एका पोस्टद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. शारीरिक हल्ले करणे हे केवळ भित्रेपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असून, हा लढा पूर्णपणे शांतता, संयम आणि प्रेमाच्या मार्गानेच पुढे नेणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. समोरून कितीही चिथावणी दिली किंवा हल्ले झाले तरी आमच्या बाजूने कोणताही हिंसक प्रकार केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयपूर आंदोलनात नेमके काय घडले?
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जयपूरमध्ये हजारो समर्थकांच्या उपस्थितीत एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
आंदोलनादरम्यान उत्साही समर्थकांनी जेव्हा दिपकेंना आपल्या खांद्यावर उचलून घेतले, त्याच गर्दीचा फायदा घेत काही जणांनी त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कानाखाली ३ ते ४ वेळा लगावल्या.
हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात: हा प्रकार पाहताच संतापलेल्या जमावाने तात्काळ त्या हल्लेखोराला पकडून चोप देण्यास सुरवात केली. मात्र, दिपकेंनी मोठेपण दाखवत हल्लेखोराला मारहाण न करण्याचे आणि सोडून देण्याचे आवाहन जमावाला केले. त्यानंतर घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी तात्काळ संबंधित हल्लेखोराला आपल्या ताब्यात घेतले आहे.










