Maharashtra Census 2027: महाराष्ट्रात ‘जनगणना 2027’ या राष्ट्रीय मोहिमेचा पहिला अत्यंत महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. घरांची यादी तयार करणे आणि गृहनिर्माण गणना या पहिल्या टप्प्याचे काम राज्यात 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत संपूर्ण खबरदारीसह राबविण्यात आले.
भारतात यापूर्वी शेवटची जनगणना वर्ष 2011 मध्ये झाली होती. त्यानंतर तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. ही देशातील 16 वी आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची 8 वी जनगणना ठरणार आहे. या पहिल्या टप्प्यामुळे आता पुढील मुख्य जनगणनेसाठी एक मजबूत पाया तयार झाला आहे.
मोबाईल अॅपद्वारे ३३ प्रश्नांची झाली नोंदणी; माहिती राहणार गुप्त
या मोहिमेदरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन डिजिटल पद्धतीने माहिती गोळा केली:
- ३३ महत्त्वाचे प्रश्न: केंद्र सरकारने निश्चित केलेल्या 33 प्रश्नांच्या आधारे ही माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने घरांची सध्याची स्थिती, कुटुंबाकडे उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्याकडील मालमत्ता (अॅसेट्स) याविषयीचे प्रश्न होते.
- गोपनीयतेची हमी: नागरिकांनी दिलेल्या सर्व वैयक्तिक माहितीला कायद्याचे संरक्षण असून ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- फेब्रुवारी २०२७ चा प्लॅन: या टप्प्यात जमा झालेल्या माहितीच्या आधारे फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या मुख्य लोकसंख्या गणनेची रूपरेषा ठरवली जाईल, जेणेकरून राज्यातील एकही नागरिक यातून सुटणार नाही.
२.४५ लाख कर्मचाऱ्यांचे मोठे जाळे; महापालिकांचाही समावेश
महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे आणि 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही मोहीम एकाच वेळी राबवण्यात आली. यासाठी प्रशासनाने एक मोठे नियोजनबद्ध जाळे तयार केले होते:
- प्रशासकीय प्रमुख: या कामासाठी 63 मुख्य जनगणना अधिकारी नियुक्त केले गेले होते, ज्यात 34 जिल्हाधिकारी आणि 29 महानगरपालिका आयुक्तांचा समावेश होता. त्यांच्या सोबतीला 947 चार्ज ऑफिसर्स कार्यरत होते.
- ब्लॉक्सची रचना: कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी राज्यात एकूण 2,20,514 हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स तयार करण्यात आले होते. प्रत्येक ब्लॉकसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती.
- प्रचंड मनुष्यबळ: या कामासाठी 141 मास्टर ट्रेनर्स, 3,850 फिल्ड ट्रेनर्स आणि तब्बल 2.45 लाख प्रगणक (इन्युमरेटर्स) व पर्यवेक्षक (सुपरवाइजर्स) अहोरात्र काम करत होते. प्रत्येक ६ कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी १ पर्यवेक्षक नेमण्यात आला होता.
प्रशासनाकडून जनतेचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार
ठरवून दिलेल्या वेळेत हे अवघड काम पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र जनगणना संचालनालयाने सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. यासोबतच या राष्ट्रीय कामात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल राज्यातील नागरिक, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि माध्यम संस्थांचेही संचालनालयाने विशेष कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – Abhijit Dipke Attack: “10 वेळा कानाखाली मारली तरी…” जयपूरमधील हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया










