Operation Tiger – महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणात गेले काही महिने सुरू असलेली ऑपरेशन टायगरची चर्चा अखेर आज खरी ठरली. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्ष पूर्ण नष्टच केल्यावर महाराष्ट्रात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उबाठाचे तुकडे केले. उबाठाच्या 10 पैकी सहा खासदार फोडून लगेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची या फुटीर गटाला मान्यताही घेतली. यानंतर उबाठा काहीच करू शकत नाही. उबाठाने घाईने व्हीप जारी करीत उद्या बैठक बोलावली, पण व्हिप काढण्यापूर्वीच स्वतंत्र गटाला मान्यता दिल्याने कारवाई होऊ शकत नाही. 19 जूनला मुंबईत शिवसेना वर्धापन दिनी हे 6 खासदार समारंभपूर्वक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या 20 आमदारांवर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे.
ऑपरेशन टायगर अशा तयारीनिशी राबवण्यात आले की शिवसेना उबाठाने आज व्हीप बजावण्याआधीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फुटीरांच्या गटाला मान्यता देऊनही टाकली होती. खासदार फुटणार याबद्दल उबाठाच्या नेत्यांना काल जवळपास खात्रीच झाली होती. त्यामुळे शेवटचे हत्यार म्हणून उबाठाने उद्या संसदीय पक्षाची तातडीची बैठक बोलावली आणि बैठकीला हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला. उद्या बैठकीला जे खासदार उपस्थित राहणार नाहीत त्यांनी उबाठाची साथ सोडली यावर शिक्कामोर्तब होईल. पण त्यांनी स्वतंत्र गट आधीच स्थापन केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या खासदारांना अॅडव्हान्स म्हणून 15 कोटी रुपये दिले. प्रत्यक्ष त्यांना 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत, असा आरोप करीत त्यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी शिवीच हासडली. यावरून संजय राऊत ट्रोल झाले.
आज दिल्लीत झालेल्या घडामोडींबद्दल एकाही फुटीर खासदाराने माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली नाही. संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टिकर आणि ओमराजे निंबाळकर हे उबाठाचे सहा खासदार पक्षातून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व खासदार आज नॉट रिचेबल होते. 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनडीएच्या बैठकीत ऑपरेशन टायगरची रुपरेषा ठरली होती. त्याच रात्री 11 वाजता दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी बंडखोर खासदारांना बोलावले होते. या बैठकीला एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. याच ठिकाणी अंतिम निर्णय झाला होता.
तत्पूर्वी काल मंगळवारी फुटीरांच्या हालचालींना वेग येताच उबाठाचे नेते खडबडून जागे झाले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्लीत शिवसेना संसदीय पक्षाची तातडीची बैठक बोलावली. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी आज व्हीप जारी केला. तोपर्यंत बंडखोर खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे पक्ष फुटणार यांची जवळपास खात्री झाल्याने उबाठाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राऊत यांच्या बोलण्यातून पक्ष फुटणार याचे पुन्हा एकदा संकेत मिळाले. याप्रसंगी संजय राऊत म्हणाले की, आमचे खासदार फुटणार याबद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. केवळ तुमच्या माध्यमातून माझ्या कानावर या गोष्टी आल्या आहेत. खासदार फुटण्याबद्दल विचाराल तर काल रात्री साडेदहा वाजता मला एका महत्त्वाच्या व्यक्तिने सांगितले की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतले जात आहे. भाव तोच आहे 50 कोटी रुपये. त्यापैकी 15 कोटी रात्री प्रत्येकाकडे पोहोचवले जाणार आहेत. त्याशिवाय हे खासदार विमानात बसणार नाहीत. या खासदारांना दिल्लीला आणण्यासाठी मग नांदेड, पुणे आणि अन्य शहरांत विमाने पाठवण्यात आली.
अशा प्रकारे जर खासदार विकत घेतले जाणार असतील तर निवडणुका लढवण्यात काय अर्थ, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष हजर होते. तर उर्वरित पाच खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. तो सर्व संवाद आम्ही ऐकला. एका खासदाराने तर 3 मिनिटांत 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. माझी बायको आजारी आहे साईबाबांची शपथ, मी तुमच्यासोबतच आहे, साईबाबांची शपथ असे तो म्हणाला. एकाने आई भवानीची शपथ घेतली. एकाने मुलाची शपथ घेतली. एकाने बाळासाहेबांची शपथ घेतली. एकाने आईची शपथ घेतली. एवढ्या शपथा घेतल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय काही पर्याय उरला नाही.
याप्रसंगी राऊत यांनी काही गंभीर आरोपही केले. फुटीर खासदारांमध्ये नाव असलेले ओमराजे निंबाळकर यांना त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या बाजूने निर्णय लावण्याचे आमिष दाखवण्यात आले, असा आरोप राऊतयांनी केला.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. अंतिम निकाल 20 जून रोजी आहे. मात्र काल 16 जूनला सर्व आरोपी हजर असतानादेखील न्यायाधीशांनी निकाल 20 जूनपर्यंत पुढे ढकलला, असे राऊत म्हणाले.
या पत्रकार परिषदेनंतर राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी संसद भवनात गेले. बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आमच्या पक्षातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याची चर्चा आमच्या कानावर आली आहे. जर असा गट तुमच्याकडे आला तर घटनेमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार निर्णय घ्यावा. निर्णय घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली होती.
मात्र, उबाठाचे नेते हे निवेदन घेऊन बिर्ला यांच्याकडे जाण्यापूर्वी कालच बिर्ला यांनी फुटीरांच्या गटाला तत्वतः मान्यता दिली आहे. फक्त नियमानुसार अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी हे खासदार बिर्ला यांची भेट घेणार आहेत, अशी चर्चा होती.
दरम्यान, उबाठातून फुटलेल्या या खासदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठमोठी आश्वासने देण्यात आली आहेत.प्रत्येक खासदाराला 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी, एकाला राज्यमंत्रिपद आणि मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी मुबलक निधी देण्यात येईल, अशाप्रकारची आश्वासने फुटीर खासदारांना देण्यात आली आहेत, असे कळते. याशिवाय कोट्यवधी रुपये देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयही जबाबदार
उबाठा फुटीवर कायदेतज्ज्ञांचे मत
उबाठाच्या खासदारांच्या फुटीला कायदेशीर आव्हान मिळू शकते का, याबाबत बोलताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे म्हणाले की, या प्रकरणात मूळ पक्षात उभी फूट आहे, फुटीला दोन तृतियांश सदस्यांची मान्यता आहे का, त्याचा पक्षावर काय परिणाम होतो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेले तर या सगळ्या गोष्टी एकत्र करून न्यायालयाला निकाल द्यावा लागेल. घटनेचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावायला हवा. तो त्यांनी नाही लावायचा तर कोणी? परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्षानुवर्षे शिवसेना फुटीचा खटला प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण आदर ठेवून म्हणावेसे वाटते की, त्यांनी लवकरात लवकर या खटल्याचा निकाल द्यायला हवा. त्यांना ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार संविधानाने दिला आहे. शिवसेना फुटीच्या बाबतीत हा निकाल का दिला जात नाही, हा प्रश्नच आहे. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनीही याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाला जबाबदार धरले आहे. बापट म्हणाले की, भारताच्या लोकशाहीचे जे पतन चालू आहे याला राजकारणी लोक जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच सर्वोच्च न्यायालयही आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्वच्छ शब्दात निर्णय द्यायला पाहिजे. तो कोर्टाने अजून दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर बंदी कायद्याचा शेवटचा अर्थ लावणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या राजकीय घडामोडींवर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, ही मोठी शोकांतिका आहे आणि मला दुःख वाटते आहे की आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाला इतर सगळ्या केसेस जास्त महत्त्वाच्या वाटतात. पण भाजपा एकानंतर एक फोडताना दिसतो आहे, असे उघड्या डोळ्याने होत असतानासुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करत आहे. न्यायाला विलंब म्हणजेच न्याय नष्ट करणे, असेच म्हणावेसे वाटते.
2029 ची निवडणूक शेवटची इम्तियाज जलील यांची टीका
गेल्या दहा बारा वर्षांत देशाच्या राजकारणात अशा काही गोष्टी घडत आहेत त्या लोकशाहीसाठी घातक आहेत. लोकशाही संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. आम्ही याचा निषेध करतो. 2029 ला जर भाजपा पुन्हा निवडून आली तर या देशात पुन्हा निवडणुका होणारच नाहीत. कारण भाजपा निवडणुका होऊच देणार नाही, अशा शब्दांत एमआयएमचे नेते आणि एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली.
निवडणुका कशासाठी?
कपिल सिब्बल यांचा सवाल
ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या राजकारणावर आक्षेप घेतला. जर एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन संसदेत जाऊन नंतर दुसर्या पक्षात आणि दुसरे चिन्ह घेणार असाल तर निवडणुका कशासाठी असा सवाल त्यांनी एक्स पोस्ट करत उपस्थित केला. कपिल सिब्ब्ल यांनी एक्सवर लिहिले की,निवडणुका कशासाठी? जर एखादा खासदार एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून संसदेत गेला असेल, तर तो नंतर दुसर्या पक्षाच्या वेगळ्या चिन्हाखाली कसा जाऊ शकतो? तो त्या नव्या चिन्हावर निवडून आलेला नसतो. घटनात्मक कायद्याचे कोणतेही तत्त्व अशा प्रकाराला परवानगी देऊ शकत नाही. अशा प्रकारचे पक्षांतर अनैतिक, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे.या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयानेच घ्यावा. ते पुढे भाजपावर टीका करत लिहितात की, अल्पमतातील सरकारचे बहुमताच्या सरकारमध्ये रूपांतर करायचे असेल, तर ते आता अगदी सोपे झाले आहे. त्यासाठी सत्तेची पदे आणि पैशाचे आमिष दाखवले जाते. तसेच ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईची धमकी दिली जाते. या माध्यमातून राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून सरकारची समीकरणे बदलून बहुमतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा हे घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
शिवसेनेतील बंड
1998 साली गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यांच्या सोबत कुणीही गेले नाही.
2005 साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली. त्यांच्या बरोबर 11 आमदारांनी पक्ष सोडला. मात्र पुढे या आमदारांनी काँग्रेस, पुन्हा शिवसेना अशा उड्या मारल्या. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. नंतर काँग्रेस सोडून 2017 साली त्यांनी स्वाभिमान पक्ष काढला. पुढे एका वर्षातच त्यांनी भाजपात प्रवेश करीत स्वाभिमान पक्ष विलीन केला. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या सोबत वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर, गणपत कदम, शंकर कांबळी, रवींद्र माने, प्रकाश भारसाकळे, विनायक निम्हण, माणिक कोकाटे, श्याम सावंत, विजय वडेट्टीवार, सुभाष बने, सुबोध मोहिते हे आमदार शिवसेनेतून बाहेर पडले.
राज ठाकरे यांनी 2005 साली शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासह राम कदम (घाटकोपर पश्चिम), प्रवीण दरेकर (मागाठाणे), बाळा नांदगावकर (शिवडी), नितीन सरदेसाई (माहीम), मंगेश सांगळे (भांडुप), रमेश वांजळे (खडकवासला), शिशिर शिंदे (भांडुप), प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम), वसंत गिते (नाशिक मध्य), उत्तमराव ढिकले (नाशिक पूर्व), अविनाश जाधव (पालघर) – तेव्हाचे आमदार, धीरज लिंगाडे (मालेगाव बाह्य) आणि सरला पाटील (धुळे ग्रामीण) यांनी शिवसेना सोडली. यापैकी सध्या केवळ बाळा नांदगावकर अजून त्यांच्या सोबत आहेत. राज ठाकरे यांनी लगेच मनसे पक्ष स्थापन केला.
अख्खा समाजवादी पक्ष फुटणार
उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचा दावा
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या उबाठातील खासदारांच्या फुटीनंतर आता उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीतही फुटीचे वारे वाहत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पार्टीला लवकरच मोठा धक्का बसणार असून, संपूर्ण समाजवादी पक्ष फुटून भाजपामध्ये येण्यास तयार असल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे.
ओमप्रकाश राजभर म्हणाले की, समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार आहे. रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एक पत्र सादर केले आहे. खाण घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याचा सूत्रधार कोण आहे, हे उत्तर प्रदेशातील प्रत्येकाला माहीत आहे. जसा फास आवळला जात आहे, तशी समाजवादी पक्षाची अस्वस्थता वाढत आहे. संपूर्ण समाजवादी पक्षच भाजपामध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनील साजन यांनी राजभर यांच्या दाव्याचा समाचार घेत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केला. साजन म्हणाले की, समाजवादी पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद कमी केली असून, 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशातून सत्तेबाहेर करण्यासाठी जनता सज्ज आहे. तसेच आगामी निवडणुकीत राजभर यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही.
खा. संजय राऊत यांची एक्स पोस्ट
नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते
ऑपरेशन नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते
यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती
खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नामामुळे वाढली
प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल
डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळविला
का म्हणता?










