Jain Flag : जैन समाजातील साधू-संतांच्या आगमनानिमित्त मुंबईतील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील रस्त्यांवर मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आधीच आक्रमक झालेली असताना, आता मालाड परिसरामध्ये एक अत्यंत संतापजनक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. मालाड पूर्व भागातील एका चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र ‘जिरेटोपाच्या’ शिल्पावर जैन समाजातील एका व्यक्तीने आपल्या धर्माचा पांढरा झेंडा लावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीव्र आक्षेप नोंदवला, तसेच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांच्या उपस्थितीत जाहीर माफी मागवून घेतली. या संपूर्ण प्रसंगाची चित्रफित (व्हिडीओ) सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने प्रसारित होत आहे.
मालाड पूर्व येथील एका गजबजलेल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या ‘जिरेटोपाचे’ भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. जैन समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान, येथील एका जैन बांधवाने शिल्पाच्या चबुतरावर चढून थेट महाराजांच्या जिरेटोपावर जैन धर्मीय पांढरा झेंडा लावला. हे कृत्य स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात असंतोष निर्माण झाला. ही माहिती मालाड येथील मनसेचे विभाग अध्यक्ष महेश फरकासे यांना मिळताच, त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या कार्यकर्त्यांसह तात्काळ चौकात धाव घेतली आणि हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
मनसे कार्यकर्त्यांचे आगमन आणि वाढता तणाव पाहता स्थानिक पोलिसांनीही चपळाई दाखवत घटनास्थळ गाठले. मनसैनिकांनी या सर्व प्रकाराला कारणीभूत ठरलेल्या जैन व्यक्तीला पोलिसांसमोरच कडक शब्दांत जाब विचारला. “छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अस्मिता आहेत. त्यांच्या जिरेटोपावर अशा प्रकारे धार्मिक झेंडा लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि इतिहास ठाऊक नाही का?” अशा तीव्र भावना मनसैनिकांनी व्यक्त केल्या. मनसेचा आक्रमक पवित्र आणि पोलिसांची उपस्थिती पाहून संबंधित जैन व्यक्तीने आपली चूक मान्य केली. त्यांनी दोन्ही हात जोडून “माझ्याकडून अनावधानाने मोठी चूक झाली आहे, मला क्षमा करावी,” असे म्हणत जाहीर माफी मागितली आणि जिरेटोपावर लावलेला तो पांढरा झेंडा स्वतःहून सन्मानाने खाली उतरवला. हा झेंडा उतरवत असताना मनसे कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यापुढे महाराष्ट्राच्या दैवतांचा असा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशाराही मनसैनिकांनी संबंधित व्यक्तीला दिला.










