Bangladesh Hindu Protest: बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू अल्पसंख्याकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथे एका मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या 81 फुटी भव्य मूर्तीचे काम कट्टरपंथियांच्या धमक्यांमुळे थांबवावे लागले आहे. या प्रकल्पाचे जवळपास 80% काम पूर्ण झाले होते. या ऐतिहासिक प्रकल्पामध्ये 50 फुटी भगवान श्रीकृष्ण आणि 30 फुटी भगवान शिव यांच्या मूर्तीचाही समावेश आहे.
सुमारे 22 कोटी बांगलादेशी टका (भारतीय चलनानुसार अंदाजे 15.6 कोटी रुपये) खर्चून उभारल्या जाणाऱ्या या मूर्तीचे काम केवळ भीतीपोटी बंद ठेवावे लागल्याचे श्री श्री राधा गोविंद मंदिर समितीचे अध्यक्ष हरिदास चंद्र दास यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा बिघडू नये म्हणून सध्या काम थांबवले असल्याचे सल्लागार श्यामलाल कुमार महांता यांनी स्पष्ट केले. मंदिर समितीने आता या प्रकरणी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्याकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
राजधानी ढाका येथे मशाल मोर्चा; आंदोलकांचा सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम
मूर्तीचे काम रोखल्याच्या आणि प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राजधानी ढाका येथे हजारो हिंदू नागरिक रस्त्यावर उतरले. ‘जय श्री राम’च्या घोषणा देत हिंदूंनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला:
- मोठा निषेध मोर्चा: हिंदू महाजोतसह अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी शाहबाग चौकातून राष्ट्रीय प्रेस क्लबपर्यंत भव्य मशाल मोर्चा काढला. ढाका रिपोर्टर्स युनिटी (DRU) इमारतीजवळही जोरदार निदर्शने करण्यात आली.
- 72तासांची चेतावणी: गाईबांधा येथे या महिन्याच्या सुरुवातीला एका कट्टरपंथिय मॉबने प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. गुन्हा दाखल होऊनही अटक न झाल्याने संतप्त हिंदू संघटनांनी तारिक रहमान सरकारला आरोपींना पकडण्यासाठी 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
- 64 जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा इशारा: मागण्या मान्य न झाल्यास बांगलादेशातील सर्व 64 जिल्ह्यांमध्ये राम मंदिरे उभारण्याचा आणि देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू महाजोत आणि राष्ट्रीय पूजा उत्सव समितीने दिला आहे. शनिवारी धार्मिक व्यवहार मंत्रालयाला या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे.
पंतप्रधानांचे आश्वासन; मात्र तरीही अल्पसंख्याकांवरील हल्ले सुरूच
मुस्लिम बहुल बांगलादेशात हिंदू हा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक समुदाय आहे, जो एकूण लोकसंख्येच्या सुमारे 8% आहे. काही महिन्यांपूर्वी मुहम्मद युनूस यांच्या कार्यकाळातील राजकीय संकटानंतर हिंदूवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली होती.
फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तारिक रहमान यांनी प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार असल्याचे अनेकदा सांगितले आहे. “धर्म हा वैयक्तिक विषय आहे, परंतु देश सर्वांचा आहे”, असे आश्वासन त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात दिले होते. मात्र, असे असतानाही चालू वर्षात 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान देशात तब्बल 133 जातीय हिंसेच्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यामुळे हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.










