Alan Greenspan : अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीला धोरणात्मक दिशा देणारे, तेथील मध्यवर्ती बँक अर्थात ‘फेडरल रिझर्व्ह’चे माजी अध्यक्ष आणि जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ॲलन ग्रीनस्पॅन यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वित्तीय आणि भांडवली बाजारातील सरकारी हस्तक्षेपाचे ते खंदे विरोधक मानले जात होते. अमेरिकेच्या चार दिग्गज अध्यक्षांना आर्थिक सल्ला देणारे अग्रगण्य धोरणकर्ते म्हणून त्यांची जागतिक स्तरावर ओळख होती. गेल्या काही काळापासून ते कंपवाताने (पार्किन्सन) ग्रस्त होते आणि याच आजाराच्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांची पत्नी अँड्रिया मिचेल यांनी दिली.
अमेरिकेच्या आर्थिक भरभराटीचे महामेरू
ॲलन ग्रीनस्पॅन यांनी १९८७ ते २००६ या प्रदीर्घ कालावधीत फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. बाजारात खेळते भांडवल राहावे यासाठी ते नेहमीच कमी व्याजदर धोरणाचे पुरस्कर्ते राहिले. त्यांच्या याच आर्थिक दूरदृष्टीमुळे १९९१ ते २००१ या दशकात अमेरिकेने आर्थिक सुवर्णकाळ अनुभवला. या आर्थिक भरभराटीचे मुख्य शिल्पकार म्हणून ग्रीनस्पॅन यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या कार्यकाळात त्यांनी रोनाल्ड रेगन, जॉर्ज बुश (सीनियर), बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश (ज्युनिअर) अशा चार अमेरिकन अध्यक्षांसोबत काम करून देशाच्या आर्थिक धोरणांची आखणी केली होती. तत्पूर्वी, १९६८ च्या अध्यक्षीय निवडणुकीत रिचर्ड निक्सन यांचे धोरणात्मक सल्लागार म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभवही त्यांच्या पाठीशी होता.
कमी व्याजदर धोरण आणि २००८ च्या महामंदीचा ठपका
ग्रीनस्पॅन यांचे आर्थिक धोरण जितके कौतुकास्पद ठरले, तितकेच ते नंतर वादाच्या भोवऱ्यातही सापडले. त्यांनी अवलंबिलेल्या कमी व्याजदराच्या धोरणामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर तरलता (पैशांचा पुरवठा) वाढली. या अतिरिक्त उपलब्धतेमुळे रोखे (बॉंड्स) आणि गृहनिर्माण (रिअल इस्टेट) क्षेत्रात मालमत्तेच्या किमती कृत्रिमरित्या प्रमाणाबाहेर वाढल्या. या फुगवट्याचा अंतिम परिणाम म्हणून २००८ मध्ये अमेरिकेच्या गृहकर्ज क्षेत्रात (सबप्राईम मॉर्टगेज संकट) अभूतपूर्व पडझड झाली.
कर्जवसुली पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे अमेरिकेतील एकापाठोपाठ एक अनेक नामांकित बँका आणि वित्तीय संस्था कोसळल्या. हे आर्थिक संकट केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता त्याचे लोण जगभरातील प्रगत राष्ट्रांमध्ये पसरले. १९३० च्या ऐतिहासिक मंदीनंतर अमेरिकेत ओढवलेल्या या सर्वात मोठ्या आर्थिक संकटासाठी (२००८-२०१० दरम्यानची जागतिक मंदी) अनेक अर्थतज्ज्ञांनी ग्रीनस्पॅन यांच्या धोरणांनाच जबाबदार धरले.
वाद आणि कर्तृत्वाचे संमिश्र वलय
विशेष म्हणजे, अमेरिकेची अर्थव्यवस्था या महामंदीच्या गर्तेत कोसळण्यापूर्वीच, म्हणजेच २००६ मध्ये ग्रीनस्पॅन हे फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदावरून सन्मानपूर्वक निवृत्त झाले होते.
ॲलन ग्रीनस्पॅन: अमेरिकन अर्थव्यवस्थेला आकार देणारे कणखर नेतृत्व, नियंत्रणमुक्तीचे धोरण आणि ‘फेड’च्या स्वायत्ततेचे रक्षक-
अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचे अध्वर्यू ॲलन ग्रीनस्पॅन यांच्या प्रदीर्घ प्रवासात रिचर्ड निक्सन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांनी त्यांची मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. हा अनुभव त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी अत्यंत मैलाचा दगड ठरला. ग्रीनस्पॅन यांना प्रामुख्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेला आधुनिक आकार देण्याचे आणि तिला एका नव्या उंचीवर नेण्याचे श्रेय दिले जाते. ‘फेडरल रिझर्व्ह’चे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक कठीण प्रसंगांमध्ये ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका बजावली आणि अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीला कमालीची गती दिली.
मुक्त अर्थव्यवस्थेची धोरणे आणि टीकेचा धनी
एकीकडे आर्थिक भरभराटीचे श्रेय मिळत असतानाच, कारकीर्द संपल्यानंतर मात्र ग्रीनस्पॅन यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे आले. अमेरिकेच्या गृहनिर्माण (रिअल इस्टेट) क्षेत्राला दिल्या गेलेल्या अमर्याद आणि शिथिल कर्जांमुळे भांडवली व वित्तीय बाजारावर जे भीषण आर्थिक संकट ओढवले, त्याचे जनक ग्रीनस्पॅन हेच असल्याचा आरोप वारंवार केला गेला. त्यांच्या याच वादग्रस्त धोरणांमुळे त्यांच्या एकूणच आर्थिक तत्त्वज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. बँका आणि ‘वॉल स्ट्रीट’ला दिलेली अनिर्बंध सवलत (नियंत्रणमुक्ती), मुक्त व्यापार धोरणांमुळे अमेरिकन नागरिकांवर ओढवलेले बेरोजगारीचे संकट आणि घरांच्या कृत्रिमरीत्या फुगवलेल्या किमती या सर्व घडामोडींसाठी इतिहासकारांनी आणि अर्थतज्ज्ञांनी त्यांच्यावर कठोर टीका केली.
‘फेड’च्या स्वायत्ततेचे रक्षण: पूर्वी आणि आता
ॲलन ग्रीनस्पॅन यांच्या कार्यकाळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जपलेली केंद्रीय बँकेची स्वायत्तता. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला किंवा राजकीय शक्तीला फेडरल रिझर्व्हच्या अंतर्गत धोरणांमध्ये आणि निर्णयात ढवळाढवळ करू दिली नाही. राजकीय दबावापुढे न झुकता तटस्थपणे निर्णय घेण्याची त्यांची हीच वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक ठळक करत असे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर ॲलन ग्रीनस्पॅन यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा ठसा-
शीतयुद्धोत्तर कालखंडातील अमेरिकन भांडवलशाहीचे स्वरूप अत्यंत आशावादी, मानवी जीवनमान उंचावण्यासाठी बाजारपेठेच्या मुक्त ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने भारावलेली अशी होती. या संपूर्ण व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी नियमन आणि हस्तक्षेपाला असलेला तीव्र विरोध. अमेरिकन अर्थव्यवस्थेची ही सर्व वैशिष्ट्ये आणि गुणधर्म म्हणजे ॲलन ग्रीनस्पॅन यांच्याच दूरगामी धोरणांचा परिपाक होता, असे मानले जाते. त्यांनी आखलेल्या आर्थिक धोरणांमुळेच अमेरिकेला जागतिक स्तरावर एक नवी आर्थिक दिशा मिळाली.
प्रसिद्धीचे शिखर आणि जागतिक बाजारपेठेवर हुकमी वलय-
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था आपल्या ऐतिहासिक तेजीत धावत होती, नेमक्या त्याच काळात ॲलन ग्रीनस्पॅन हे एक अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते म्हणून लोकप्रियतेच्या व प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होते. जागतिक अर्थकारणावर आणि विशेषतः भांडवली बाजारावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड प्रभाव होता. वॉल स्ट्रीटपासून ते जागतिक शेअर बाजारापर्यंत प्रत्येक जण त्यांच्या विधानांकडे डोळे लावून असायचा. ग्रीनस्पॅन यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर केलेली एक छोटीशी टिप्पणी किंवा त्यांचे एक सूचक वाक्यही आंतरराष्ट्रीय शेअर बाजार गतीने झेपावण्यास किंवा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळण्यास कारणीभूत ठरत असे.










