ST Smart Card : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या तिकीट प्रणालीला पूर्णपणे हायटेक करण्याचा निर्णय घेतला असून, सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावलीत मोठा बदल केला आहे. आगामी 1 ऑगस्टपासून एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) वापरणे बंधनकारक असणार आहे.
प्रवासात होणारे बनावट ओळखपत्रांचे गैरप्रकार रोखणे आणि तिकीट वाटपामध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी महामंडळाने हे कडक पाऊल उचलले आहे.
या नवीन डिजिटल प्रणालीमुळे वाहकांकडे (कंडक्टर) सुट्या पैशांवरून होणारे रोजचे वाद पूर्णपणे मिटणार असून डिजिटल पेमेंटला मोठी चालना मिळणार आहे. यापूर्वी हा नियम केवळ ठराविक श्रेणींसाठी होता, मात्र आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे.
१ ऑगस्टनंतर कार्ड नसेल तर प्रवासाची सवलत बंद; जाणून घ्या नवीन अटी:
एसटी प्रशासनाने सर्व प्रवाशांना 1 ऑगस्टपूर्वी हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले आहे. या योजनेशी संबंधित महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
- पूर्ण तिकीट मोजावे लागणार: १ ऑगस्टपर्यंत ज्या प्रवाशांनी हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेतले नसेल, त्यांना एसटी प्रवासादरम्यान मिळणारी कोणतीही सवलत नाकारली जाईल आणि इतर सामान्य प्रवाशांप्रमाणे पूर्ण भाडे द्यावे लागेल.
- ३५ घटकांना सक्ती: एसटी सध्या विद्यार्थी, पत्रकार, खेळाडू, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसह तब्बल 35 वेगवेगळ्या श्रेणींतील प्रवाशांना 33 टक्क्यांपासून ते अगदी 100 टक्क्यांपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देते. आता या सर्व 35 प्रकारच्या प्रवाशांना कार्ड घेणे अनिवार्य आहे.
- श्रेणीनुसार वेगवेगळी मुदत: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड केवळ चालू शैक्षणिक वर्षापुरते वैध असेल. तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत त्यांच्या मूळ प्रमाणपत्राच्या वैधतेनुसार कार्डची मुदत निश्चित केली जाईल.
काय आहे ‘एनसीएमसी’ कार्ड आणि ते कुठे मिळणार?
हे कार्ड केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या धोरणाचा एक भाग आहे. हे एक अद्ययावत स्मार्ट कार्ड आहे, ज्याचा वापर प्रवाशांना केवळ एसटी बसमध्येच नाही, तर मेट्रो, लोकल ट्रेन आणि देशातील इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये डिजिटल तिकीट काढण्यासाठी करता येईल.
कार्ड कुठे आणि कसे काढावे?: हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांनी आपल्या जवळच्या मुख्य एसटी बस स्थानकावर किंवा आगारातील अधिकृत खिडकीवर जावे लागेल. तिथे अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
- पॅन कार्ड
- ओळखपत्राचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- तुम्ही ज्या सवलतीसाठी पात्र आहात त्याचे अधिकृत सरकारी प्रमाणपत्र (उदा. शाळा किंवा कॉलेजचे बोनाफाइड, अपंगत्व प्रमाणपत्र किंवा वयाचा पुरावा).
जास्त पैसे आकारल्यास किंवा सवलत नाकारल्यास इथे करा तक्रार
जर एखाद्या प्रवाशाकडे वैध स्मार्ट कार्ड असतानाही बसमधील वाहकाने सवलत देण्यास नकार दिला किंवा तिकिटासाठी जास्त पैसे वसूल केले, तर प्रवाशांना थेट दाद मागता येणार आहे. नागरिक एसटी महामंडळाच्या 1800-22-1224 या टोल-फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय, स्थानिक आगार व्यवस्थापकांकडे (डेपो मॅनेजर) लेखी स्वरूपात तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित










