Mumbai Rain Red Alert : तब्बल १५ दिवस उशिराने आगमन झालेल्या मान्सूनने गेल्या काही तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मंगळवारी मुंबईत पावसाचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा केली होती, ज्यानंतर रात्रीपासूनच संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही तासांत मुंबई आणि पालघर परिसरात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उपनगरात पाणी साचले; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद व पुन्हा सुरू
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. विशेषतः अंधेरी सबवेमध्ये ३ ते ४ फूट पाणी साचल्यामुळे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागला होता. या काळात पोलिसांनी वाहनचालकांना गोखले पुलाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, सकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर या सबवेमधील पाण्याचा निचरा झाला असून तो वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे; सध्या तेथील उर्वरित एक फूट पाणी महानगरपालिकेच्या पंपांद्वारे उपसले जात आहे. दुसरीकडे दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल गाड्यांचा वेग मंदावला होता, तर दादर पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिराजवळ एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.
ट्रान्सहार्बर रेल्वे ठप्प; युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्वपदावर
नवी मुंबईत मुसळधार पावासामुळे वाशी-ठाणे ट्रान्सहार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे रुळांखालील माती वाहून गेल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक सुमारे ४५ मिनिटे पूर्णपणे ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून, पाण्याचा निचरा झाल्यावर अप लाईन सकाळी ७:२७ वाजता आणि डाऊन लाईन ७:३५ वाजता पूर्वपदावर आणली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सध्या या मार्गावर गाड्या गती मर्यादा (स्पीड लिमिट) ठेवून चालवल्या जात आहेत.
वसई-विरारमध्ये संततधार आणि कोकणात ‘रेड व ऑरेंज अलर्ट’
मुंबईच्या परिघातील वसई, विरार आणि पालघर परिसरालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. नालासोपारा येथील सेंट्रल पार्क, तुळींज, स्टेशन परिसर, गाळा नगर, आचोळे रोड या सखल भागांत पाणी साचले असून पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. हा जोर कायम राहिल्यास नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या साडेआठ तासांत राम मंदिर परिसरात सर्वाधिक २२४ मिमी, कुलाब्यात २१८.५ मिमी आणि सांताक्रुझमध्ये २१०.६ मिमी इतक्या अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकणाचा विचार केला असता, रत्नागिरी जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा म्हणजेच ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून उद्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगडला आज ‘ऑरेंज’ तर पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सिंधुदुर्गात उद्या ‘यलो’ आणि त्यानंतरच्या दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.









