Mumbai Local Train Murder: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना लोकलचा दरवाजा उघडा ठेवायचा की बंद, यावरून प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चालत्या ट्रेनमध्ये चाकू भोससून हत्या करण्यात आली.
मयंक लोहार असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही भयंकर घटना चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात मंगळवारी रात्री साधारण 10.50 च्या सुमारास घडली. ट्रेन अंधेरी आणि बोरिवली स्थानकांच्या दरम्यान धावत असताना डब्यात पावसाचे पाणी येत असल्याने प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने अचानक तीक्ष्ण हत्यार उपसून मयंकच्या छातीवर आणि पोटावर वार केले.
मयंक रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला, तर ट्रेन बोरिवली स्थानकात पोहोचण्यापूर्वीच आरोपीने चालत्या गाड्यातून उडी मारून पळ काढला. मयंकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
४00 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ७ पथके; पोलिसांची मोठी मोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आरोपीला पकडण्यासाठी मोठी चक्रे फिरवली:
- विशेष तपास पथके: रेल्वे पोलीस आणि पश्चिम रेल्वे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 7 विशेष तपास पथके तातडीने तयार करण्यात आली.
- सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास: बोरिवली, अंधेरी, मिरा रोड आणि नालासोपारा स्थानकांवरील, तसेच बाहेरील परिसरातील तब्बल 400 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले.
- २४ तासांत आरोपी गजाआड: तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० वर्षीय आरोपी सचिन रमेश सुवर्णा याला नवी मुंबईच्या पनवेल परिसरातून अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली.
वडिलांसमोर कबुली देऊन पळण्याच्या तयारीत होता आरोपी
आरोपी सचिन सुवर्णा हा मिरा रोड पूर्व येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लोकल ट्रेनमधील या रक्तरंजित घटनेनंतर तो थेट घरी पोहोचला होता. त्याने आपल्या वडिलांना लोकलमध्ये वाद झाल्याची आणि गुन्हा घडल्याची कबुली दिली होती. अटक होण्याच्या भीतीने तो मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबई सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्याचे काम सुरू आहे.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चालत्या ट्रेनमध्ये हत्येची या वर्षातील ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मालाड स्थानकावर ट्रेनमधून उतरताना झालेल्या वादात एका 32 वर्षीय कॉलेज प्राध्यापकाची हत्या करण्यात आली होती.
“आरोपीला फाशीच द्या”; मयंकच्या कुटुंबाचा आक्रोश
या घटनेनंतर मयंकच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. मयंकच्या शोकाकुल बहिणीने प्रशासनाकडे न्याय मागताना सांगितले की, “माझे सगळे काही संपले आहे, आता आम्हाला केवळ आणि केवळ न्याय हवा आहे. त्या नराधम आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, त्यापेक्षा कमी कोणतीही शिक्षा आम्हाला मान्य नाही.” कुटुंबाने रेल्वे प्रशासनाला भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा










