UDAN Scheme: देशातील छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजना सुरू केली होती. मात्र, आता या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठा फटका बसला आहे.
देशातील तब्बल 15 विमानतळांवरील व्यावसायिक विमान उड्डाणे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. प्रवाशांची कमी संख्या, विमान कंपन्यांची अनास्था आणि तांत्रिक आव्हाने यामुळे प्रादेशिक विमान वाहतुकीच्या शाश्वततेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बंद पडलेल्या १५ विमानतळांमध्ये सर्वाधिक ७ विमानतळ एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. याशिवाय पंजाबमधील २, तर पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील प्रत्येकी १ विमानतळाचा यामध्ये समावेश आहे.
UDAN Scheme: विमानसेवा ठप्प होण्याची मुख्य कारणे काय?
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, हे विमानतळ बंद पडण्यामागे अनेक अंतर्गत आणि तांत्रिक कारणे आहेत:
- आर्थिक मदतीची मुदत संपणे: उडान योजनेअंतर्गत दुर्गम भागात स्वस्त तिकीट राखण्यासाठी सरकार विमान कंपन्यांना आर्थिक मदत (व्हायाबिलिटी गॅप फंडिंग) देते. अनेक विमानतळांवर या मदतीची ३ वर्षांची मुदत संपल्यामुळे कंपन्यांनी सेवा बंद केली.
- हवामान आणि तांत्रिक अडचणी: अनेक छोट्या विमानतळांवर वैमानिकांना बाहेरील परिस्थिती पाहून विमान उतरवावे लागते. हिवाळ्यात किंवा खराब हवामानात दृश्यमानता कमी असल्यामुळे उड्डाणे रद्द करावी लागतात.
- विमानांचा तुटवडा: विमान कंपन्यांकडे विमानांची भाडेपट्टी आणि विमानांच्या सुट्या भागांची कमतरता असल्याने सेवा विस्कळीत झाली आहे.
- प्रवाशांचा अल्प प्रतिसाद: अनेक शहरांमध्ये विमानातील जागा पूर्ण भरत नसल्याने विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता, ज्यामुळे त्यांनी सेवा तात्पुरती थांबवली आहे.
UDAN Scheme: पश्चिम बंगालच्या कूचबिहार विमानतळाचे उदाहरण; १० कोटींचा खर्च वाया?
या योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील कूचबिहार विमानतळाचा विकास करण्यासाठी सुमारे 10.45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या विमानतळावरून व्यावसायिक सेवा सुरू झाली. मात्र, विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या अत्यंत कमी प्रतिसादामुळे गेल्या वर्षी मे महिन्यापासून येथील विमानसेवा पूर्णपणे ठप्प आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला विमानतळावरही हिवाळ्यात हवामानामुळे वारंवार सेवा विस्कळीत होत असते.
UDAN Scheme: विमानतळांच्या संख्येत मोठी तफावत; सरकारचा दावा काय?
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभा आणि राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीमध्ये काही प्रमाणात तफावत दिसून आली आहे. राज्यसभेत १५ विमानतळ बंद असल्याचे सांगितले गेले, तर लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात एकूण 164 विमानतळ कार्यरत असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (AAI) २२ विमानतळ सध्या अकार्यरत आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ओडिशातील राउरकेला आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथील विमानसेवा काही काळ बंद झाल्यानंतर आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच जोधपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून तिथली सेवाही पूर्ववत झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये देशात केवळ ७४ कार्यरत विमानतळ होते, जे उडान योजनेअंतर्गत १.४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे आता १६५ च्या आसपास पोहोचले आहेत.










