Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील फुटीर खासदारांच्या मतदारसंघात शिवसेना प्रमुखांनी झंझावाती दौऱ्यांचे आयोजन केले आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघापाठोपाठ विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा गाजवून आज उद्धव ठाकरे यांची तोफ शिर्डीमध्ये धडकली. शिर्डीतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर त्यांनी अत्यंत शेलक्या आणि तिखट शब्दांत प्रहार केला. “पक्षात झालेली ही खासदारांची फुटाफुटी म्हणजे कोणतंही ‘ऑपरेशन टायगर’ नसून, हे पडद्यामागून चालवलेले ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही कडाडून टीका केली.
“हे भाऊसाहेब नाहीत, तर ‘खाऊसाहेब’ वाकचौरे”; मतदारांना थेट आवाहन
शिर्डीच्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारत त्यांना ‘खाऊसाहेब’ असे नवीन नाव दिले. ठाकरे म्हणाले की, “काही लोकांच्या रक्तामध्येच गद्दारी भिनलेली असते. हे भाऊसाहेब नाहीत, तर जिथे जाईल तिथे खाणारे ‘खाऊसाहेब’ वाकचौरे आहेत. सन २००९ मध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांनी पदरमोड करून यांना निवडून आणले होते, पण २०१४ मध्ये हे पळाले आणि काँग्रेसमध्ये गेले; तिथेही त्यांनी बट्याबोळ केला. २०१४ ला जर वाकचौरे पळाले नसते आणि पक्षात थांबले असते, तर केंद्रात आपलेच सरकार होते. आता जरी ते थांबले असते, तरी पुन्हा आपलेच सरकार येणार आहे.” तसेच, “आपला खासदार पळाला आहे, तो मतदारसंघात कुठे सापडला तर त्याला सोडू नका, जनतेनेच त्याचा हिशोब चुकता करावा,” असे थेट आवाहन त्यांनी जनतेला केले.
“भ्रष्ट राजवट गाडून टाक, देवेंद्र यांच्या खुर्चीचे रक्षण कर”; साईचरणी आगळीवेगळी प्रार्थना
उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान शिर्डीचे आराध्य दैवत असलेल्या साईबाबांच्या चरणी एक खोचक आणि राजकीय प्रार्थना केली. ते म्हणाले, “हे साईबाबा, ही भ्रष्ट राजवट गाडून टाक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचे रक्षण कर. कारण प्रत्येकाचा कुठेतरी शेवट हा ठरलेला असतो. सन २०२९ नंतर आपला वाली कोण, या शर्यतीत देवेंद्र फडणवीस येऊ शकतात, म्हणूनच दिल्लीश्वरांनी आत्ताच त्यांचा पत्ता कट करण्यासाठी ‘शाहसेनेला’ (एकनाथ शिंदे गट) सुपारी दिली आहे. शाहसेनेला फडणवीसांना गुंतवून ठेवण्याचे काम दिले आहे. शाहसेनेने आमचे खासदार फोडले आणि आज राज्यात भाजपपेक्षा जास्त खासदार शाहसेनेचे झाले आहेत.” या फोडाफोडीच्या राजकारणामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचा थेट अंगुलीनिर्देश त्यांनी केला.
“नीटचा पेपर फुटला आणि खासदार फोडायला यांच्याकडे पैसे आहेत”
खासदार वाकचौरे यांच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, खासदार निधी म्हणून यांना १५ कोटी रुपये मिळाले होते, परंतु त्यांनी केवळ ७० लाख रुपये खर्च केले. हा जनतेच्या कराचा पैसा आहे, निधी तर मिळणारच, पण सध्या देशात फक्त फुटाफुटीचे आणि पेपरफुटीचे दिवस सुरू आहेत. “एकीकडे विद्यार्थ्यांचा ‘नीट’ (NEET) परीक्षेचा पेपर फुटतो, तर दुसरीकडे खासदार फोडण्यासाठी यांच्याकडे कोट्यवधी रुपये उपलब्ध आहेत. ही नीच आणि नालायक वृत्ती आहे. आज राज्यात बैल नाही म्हणून शेतकऱ्याची पत्नी स्वतः नांगर ओढत असल्याचे विदारक चित्र आहे. ही बातमी आल्यानंतर सरकारने तिथे बैल दिला, पण त्यापेक्षा जनतेला प्रामाणिक खासदार देण्याची गरज होती,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
“कोंबडीसारखे जगू नका; उद्याचा दिवस आपलाच असेल”
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला आणि शिवसैनिकांना अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे आवाहन केले. “आपली अवस्था कोंबडीच्या पिंजऱ्यासारखी झाली आहे. आज एक कोंबडी कापली जातेय, तर दुसरी कोंबडी मालकाने टाकलेले दाणे खाण्यात व्यस्त आहे; तिला हे माहीत नाही की उद्या आपलीही तीच अवस्था होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोंबड्यांसारखे जगू नका. आज कठीण काळ असला तरी उद्याचा दिवस नक्कीच आपला असेल. राजकारणात चढ-उतार होत असतात. या लोकांना देशाचे विभाजन करण्यासाठी संसदेत दोनतृतीयांश बहुमत हवे आहे. त्यासाठीच ही खासदार फोडाफोडी सुरू आहे. ठाकरे संपला की महाराष्ट्रात प्रश्न विचारणारा कोणी उरणार नाही, असा त्यांचा गैरसमज आहे; परंतु हिंदुहृदयसम्राट ही जागा फक्त बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि तो एक विचार आहे, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंना फटकारले.
विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘पंख’ छाटण्यावरून खोचक टोला
मुख्यमंत्री म्हणतात की मला पंख नाहीत, मी काही पक्षी नाही, मग माझे पंख कसे छाटणार? अहो, पंख छाटणे हा एक मराठीतील वाक्प्रचार आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधी विधानसभा अध्यक्षांकडून मराठी शिकून घ्यावी. जर तुम्ही पक्षी नाही आहात, तर मग तुमचे नेमके काय कापायचे ते तुम्हीच सांगा,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरही निशाणा साधला. “ज्या विधानसभा अध्यक्षांना नीट मराठी बोलता येत नाही, ते माझ्या पक्षाचा आणि लोकशाहीचा निर्णय देणार? अशा व्यक्तीकडून विधानसभेचा कारभार चालणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ‘सहन होत नाही आणि पचतही नाही’ अशी झाली असून, त्यांना दिल्लीसमोर नतमस्तक व्हावे लागत आहे. मात्र, फडणवीस आणि नितीन गडकरी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
“३ वर्षांच्या आत आपले सरकार येईल; खासदारांचे जाणे हा शुभशकुन”
भाषणाचा शेवट करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे भाकीत केले. ते म्हणाले, “जे सोडून गेले त्यांच्यात आता गद्दारीचे रक्त आहे. आता या खासदार फोडणाऱ्यांना कसे फोडायचे, हे जनताच बघून घेईल. माझ्याकडे श्रद्धा आणि सबुरी दोन्ही आहेत; पण जो कोणी नडला, त्याला तुडवण्याची हिंमतही माझ्यात आहे. पुढील तीन वर्षांच्या आत राज्यात आपले सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे पक्षातून खासदार जाणे हा एकप्रकारे शुभशकुनच आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.










