Ashadhi Ekadashi 2026 : आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्तांना वेध लागतात ते म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचे, आषाढी एकादशीचे आणि शतकानुशतकांची परंपरा असलेल्या पंढरीच्या पायी वारीचे. वैदिक पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च स्थान आहे. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीविठ्ठलाच्या भक्तांसाठी हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि समतेचे अलौकिक प्रतीक मानला जातो. यंदा २०२६ या वर्षामध्ये आषाढी एकादशी कधी आहे, पालखी सोहळा कधी सुरू होणार, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व याबद्दलची सविस्तर माहिती समोर आली आहे.
२५ जुलै रोजी आषाढी एकादशी आणि चातुर्मास प्रारंभ-
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा २०२६ या वर्षामध्ये आषाढी एकादशी शनिवार, २५ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवसाला ‘शयनी एकादशी’ असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र तिथीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेसाठी प्रस्थान करतात. याच दिवसापासून हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या ‘चातुर्मासाचा’ (चार महिन्यांचा पवित्र काळ) प्रारंभ होतो. हा काळ व्रतवैकल्ये आणि आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो.
आषाढी एकादशी तिथी, शुभ मुहूर्त आणि पारणाची वेळ-
यंदा आषाढी एकादशीचे व्रत करणाऱ्या भाविकांसाठी तिथी आणि उपवास सोडण्याची म्हणजेच पारणाची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. पंचांगानुसार, एकादशी तिथीचा प्रारंभ शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:१५ वाजता होणार आहे. तर एकादशी तिथीची समाप्ती शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:३५ मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार शनिवार, २५ जुलै रोजी मुख्य एकादशी साजरी केली जाईल. या व्रताचे पारण म्हणजेच उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ५:३० ते सकाळी ८:३० या वेळेत असणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (देहू प्रस्थान)
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी देहू गावातून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. टाळ-मृदंगाच्या आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात हा सोहळा पुढे निघेल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुख्य मार्ग देहू येथून सुरू होऊन आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर आणि अकलूज मार्गे वाखरी येथे पोहोचेल.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (आळंदी प्रस्थान)
माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी आळंदी देवस्थानवरून पंढरपूरसाठी प्रस्थान करेल. सुमारे १७ दिवसांचा अत्यंत शिस्तबद्ध पायी प्रवास पूर्ण करून ही पालखी पंढरपूरकडे कूच करेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पारंपारिक मार्ग आळंदीवरून निघून पुणे (भवानी पेठ), सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस परिसर आणि वाखरी असा असणार आहे.
२४ जुलै रोजी प्रमुख पालख्या पंढरपुरात दाखल होणार
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही वारी लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने उजळून निघते. हजारो दिंड्या, भगव्या पताका आणि विठ्ठलनामाच्या गजरात निघालेले हे दोन्ही मुख्य पालखी सोहळे शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी पंढरपूरच्या पवित्र भूमीत म्हणजेच वाखरी मुक्कामानंतर पंढरपूर शहरात दाखल होतील. त्यानंतर लाखो वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान करतील.
आषाढी एकादशीच्या दिवशी करायची धार्मिक कृत्ये आणि नियम
धार्मिक मान्यतेनुसार, आषाढी एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक केल्याने मनुष्याच्या जन्मांतरीच्या पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी भाविकांनी पहाटे लवकर उठून पवित्र स्नान करावे आणि भगवान विष्णू व विठ्ठलाची षोडशोपचार पूजा करावी. दिवसभर मनात आणि मुखात नामस्मरण, जप, भजन आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. उपवासाच्या नियमांनुसार या दिवशी तांदूळ, गहू, डाळी आणि कोणत्याही प्रकारच्या धान्ययुक्त पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळावे. आपल्या प्रकृतीनुसार फळा आहार करावा किंवा शक्य असल्यास निर्जला उपवास करावा.
( टीप : वरील बातमी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. ह्या बातमीची पुष्टी आम्ही करत नाही. या बातमीत वाचकांच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही)










