Lohagad : केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून ठार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आणखी काळ पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे म्हणत वडगाव सत्र न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवले. यामुळे या दोघांना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोघांना त्यांच्या कृत्यात एका मित्राने मदत केली अशी चर्चा होती. मात्र पोलीस अहवालात असा कोणताही उल्लेख नाही, असे सियाच्या वकिलाने सांगितले.
आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाने न्यायालयात दोघांची तीन दिवसांची पोलीस कोठडी मागताना सांगितले की, मोबाईलमधील डेटा मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून पडताळणी करणे आवश्यक आहे. दोघे सांकेतिक भाषेत बोलले आहेत. तपास अधिकार्यांनी सांगितले की, लोहगडावर सिया बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली वाकली आणि त्याचवेळी चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा संशय आहे. या कटात आणखी कुणा जवळच्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींची पॉलिग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी घेण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, न्यायालयाने या चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सरकारी वकिलांनी सध्या नार्को चाचणीची गरज नसल्याचे सांगितले. बचाव पक्षाने न्यायालयात दावा केला की, सिया गोयल तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. गेले 14 दिवस ते पोलीस कोठडीत होते. सियाचा फोनही पोलिसांकडे आहे. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्यासाठी आवश्यक ठोस कारणे नाहीत. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
तपास अधिकारी मनोज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान चेतनची घटनाक्रमाबाबत सखोल विचारपूस केली. सियाकडे तिच्या पासपोर्टसह इतर बाबींवरून चौकशी केली. याशिवाय, पोलिसांनी सिया गोयलने हत्येची रिहर्सल पुण्यातील ज्या लुल्लानगर परिसरात केली होती, असा संशय आहे. तिथे नेऊन घटनास्थळाची पडताळणी केली. सियाच्या घरातून घटना घडली त्या दिवशी तिने परिधान केलेले कपडेही जप्त केले असून, ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
केतन अगरवालच्या हत्येच्या तपासात नवनवे खुलासे होत आहेत. या हत्येच्या कटात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यानंतर आता तिसर्या व्यक्तीचा सहभाग असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बीडच्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याला या संपूर्ण कटाची पूर्वकल्पना असल्याचे तपासातून बाहेर आले झाले. तरुण सध्या पुण्यातील बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. चेतन आणि सियाने केतनला कसे वाटेतून बाजूला करणार आहोत, याच्या संपूर्ण कटाची या तरुणासोबत चर्चा केली होती. त्यांनी या तरुणाला 18 जून रोजी लोहगडावर आपल्यासोबत येण्याचा आग्रहही केला होता. मात्र, त्याने नकार दिला. चेतन- सियाला ‘असे काही करू नका’ असा सल्लाही दिला. केतनचा खून केल्यानंतर चेतन सगळ्यात आधी याच मित्राला भेटला होता. त्यानंतर सियानेही त्याच्याशी संपर्क साधला होता. पोलीस सध्या त्याचे कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल चॅट तपासत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून, पोलीस त्याला या गुन्ह्यात ‘माफीचा साक्षीदार’ बनवण्याची शक्यता आहे.










