Aadhaar App Update: देशातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना आपल्या आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कोणत्याही आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.
प्रशासनाने नवीन मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे थेट स्मार्टफोनवरूनच ई-मेल अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला बळ देण्याच्या उद्देशाने आणि लोकांचा वेळ वाचवण्यासाठी ही आधुनिक डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे.
पुढील ६ महिने सेवा पूर्णपणे मोफत; ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार लाभ
या नवीन सुविधेबाबत प्रशासनाने जाहीर केलेले नियम आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- शुल्क किती असणार?: नवीन मोबाईल अॅपद्वारे ई-मेल आयडी जोडणे किंवा अपडेट करणे ही सेवा सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे.
- अंतिम मुदत: ही मोफत सेवा 1 जुलै 2026 पासून सुरू झाली असून ती या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत मोफत उपलब्ध राहील.
- नागरिकांचा मोठा प्रतिसाद: सेवा सुरू झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांत (1 आणि 2 जुलै ) तब्बल 2.5 लाखाहून अधिक लोकांनी आपल्या ई-मेलची नोंदणी केली आहे.
नवे अॅप कसे डाउनलोड करायचे? आणि त्याचे फायदे काय?
नागरिक गुगल प्ले स्टोअर (Android) किंवा अॅपल अॅप स्टोअर (iOS) वरून हे नवीन अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. यापूर्वी वापरात असलेल्या जुन्या अॅपऐवजी 1 जुलै पासून हे नवीन आधुनिक अॅप पूर्णपणे कार्यान्वित झाले आहे.
गेल्या ५ महिन्यांत या अॅपला 3.1 कोटींहून अधिक लोकांनी डाउनलोड केले असून, याद्वारे 40 लाख लोकांनी मोबाईल नंबर आणि 10 लाख लोकांनी आपल्या पत्त्यामध्ये सुधारणा केली आहे.
ई-मेल आयडी लिंक करण्याचे सर्वात मोठे फायदे:
- सुरक्षेचा अतिरिक्त थर: जेव्हा कधी तुमच्या माहितीचा वापर करून प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) केले जाईल, तेव्हा तुमच्या ई-मेलवर त्वरित सूचना (रिअल-टाइम नोटिफिकेशन) येईल.
- पारदर्शकता: यामुळे तुमच्या संमतीशिवाय तुमच्या माहितीचा गैरवापर करणे कोणालाही शक्य होणार नाही आणि खात्याची सुरक्षा वाढेल.
अनेक आधुनिक फीचर्सने सज्ज; ओळख पटवणे होणार सोपे
या नवीन अॅप्लिकेशनमध्ये फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखून पडताळणी), क्यूआर कोड आधारित पडताळणी आणि प्रायव्हसीवर आधारित डेटा शेअरिंगसारखे प्रगत तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
हॉटेल चेक-इन, रुग्णालयात दाखल होताना, विमानतळावर प्रवेश करताना किंवा कोणत्याही सेवा भागीदाराची ओळख पटवण्यासाठी या अॅपमधील क्यूआर कोडचा वापर केला जाऊ शकतो. लॉग-इन केल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून केवळ नाव आणि मोबाईल नंबर त्वरित सुरक्षितपणे शेअर करता येणे शक्य आहे. अधिकृत माहितीसाठी नागरिक प्रशासनाच्या मुख्य संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.










