Raj Thackeray : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्यांवरील खड्डे, तसेच उघड्या मॅनहोलमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दुर्दैवी घटनांनी संपूर्ण मुंबई हादरली. २९ जून रोजी चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने अवघ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर २ जुलै रोजी साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरांतून तीव्र टीका होत असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना या दोन्ही घटनांवर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली. मात्र, या चर्चेदरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये नागरिकांच्या मृत्यूशी संबंधित चर्चेदरम्यान ते हसताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर सविस्तर भूमिका मांडत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये सत्तेचा अहंकार वाढल्याची भावना देशभरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत लोकांच्या मनात आधीपासून नाराजी होती; मात्र आता त्याच प्रवृत्तीचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसू लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत, राज्यातील राजकारण हे विचार, सुसंस्कृतपणा आणि राजकीय परिपक्वतेसाठी देशभर ओळखले जात होते, असे नमूद केले. विविध पक्षांतील मतभेद असूनही चुकीच्या कृतीचे समर्थन करण्याची परंपरा महाराष्ट्रात नव्हती. परंतु गेल्या काही वर्षांत ही मूल्यव्यवस्था कमकुवत होत चालल्याचे चित्र दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आमदार अमित साटम यांच्या कथित वर्तनावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी, नागरिकांच्या मृत्यूशी संबंधित गंभीर चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधीने हसणे ही अत्यंत असंवेदनशील बाब असल्याचे म्हटले. अशा प्रकारच्या वर्तनानंतरही कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ या प्रसिद्ध उक्तीचा उल्लेख करत त्यांनी, सत्तेच्या अहंकारामुळे उत्तरदायित्वाची भावना कमी होत असल्याचे सांगितले. कोणालाही आपल्या कृतीबद्दल खंत किंवा जबाबदारीची जाणीव उरलेली दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील नागरिकांना ते सुसंस्कृत आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून परिचित आहेत. स्वतःलाही त्यांच्याबद्दल अशीच भावना होती. मात्र अशा गंभीर घटनांनंतर आणि त्यानंतर घडणाऱ्या कथित असंवेदनशील वर्तनाबाबत मुख्यमंत्री म्हणून स्पष्ट भूमिका किंवा खेद व्यक्त होत नसल्याने त्यांच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले
राजकारणातील आपल्या सुमारे ३७ वर्षांच्या अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी कोणत्याही पक्षातील नेत्याकडून चूक झाली, तर केवळ तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून त्याचे समर्थन केले जात नव्हते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून चुकीच्या कृतीचे समर्थन करण्याची भूमिका कधी घेतली नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाची देशभर वेगळी ओळख निर्माण झाली होती, असे त्यांनी म्हटले.
सध्याच्या परिस्थितीत मात्र पक्षनिष्ठेला प्राधान्य देत चुकीच्या कृतींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. काही मंत्री व पदाधिकारी सातत्याने वादग्रस्त किंवा असंवेदनशील वक्तव्ये करत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. वेळेवर कठोर भूमिका घेतली असती, तर अशा घटनांची पुनरावृत्ती झाली नसती, असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज ठाकरे यांनी, मुख्यमंत्री या नात्याने त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते, असे सांगितले. त्यामुळे अशा प्रसंगी स्पष्ट संदेश देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यथा स्वकीयांच्या चुका झाकणारे नेतृत्व अशी प्रतिमा निर्माण होण्याचा धोका असून, त्याचा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, आपण सुज्ञ नेतृत्व आहात आणि महाराष्ट्राला आपल्याकडून जबाबदार भूमिकेची अपेक्षा आहे. त्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका. अन्यथा चुकीच्या गोष्टींना संरक्षण देण्याची परंपरा निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत मूल्यांना धक्का बसेल, असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.










