Home / महाराष्ट्र / Rain : झाडे कोसळून आणखी दोघांचा मृत्यू !  मुंबईत पावसाचे पाच दिवसांत चार बळी

Rain : झाडे कोसळून आणखी दोघांचा मृत्यू !  मुंबईत पावसाचे पाच दिवसांत चार बळी

Rain : चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा बळी गेल्यावर आज आरे कॉलनी आणि कुर्ला येथील...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Rain : चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा बळी गेल्यावर आज आरे कॉलनी आणि कुर्ला येथील झाडे पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी दोघा मुंबईकरांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई परिसरात पावसाशी संबंधित मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. यातील तीन घटना झाडे पडण्याच्या आहेत.  त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, आणखी किती बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार आहे, असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत.


कुर्ला (पश्चिम) येथील कमानी परिसरातील गोम्स गाऊन बिल्डिंग पालिका शाळेजवळ दुपारी 12.40  वाजण्याच्या सुमारास दुपारी मोठे झाड एका दुकानावर कोसळले. या दुर्घटनेत दुकानात असलेले 63 वर्षीय युनूस कुंदावाला गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर चार तास उलटूनही महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी न आल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महापौर रितू तावडे घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. मुंबईकरांनी नेमके खाली पाहून चालायचे की वर पाहून? वर पाहिले नाही तर झाड कोसळण्याची भीती आणि खाली पाहिले नाही तर उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याचा धोका. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने उत्तर द्यावे, असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला. नंतर या आंदोलनात उबाठा नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही सहभाग घेतला.


या आंदोलनावेळी मनसे नेते म्हणाले की, इथे एका निष्पाप माणसाचा जीव गेला आहे, पण पालिका प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्घटना घडून चार तास झाले तरी अद्याप एकही अधिकारी फिरकलेला नाही. हे आम्ही खपवून घेणार नाही.
मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे या तिथे पोहोचल्या. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, ही दुर्दैवी घटना आहे. यामध्ये पालिका प्रशासनाला पाठीशी घालण्याचे किंवा पाठिंबा देण्याचे कारण नाही. एका वयोवृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते त्या ठिकाणी त्यांचे दुकान उघडण्यासाठी आलेले होते, अशी माहिती आहे, या ठिकाणी झाड डेंजर झोनमध्ये दिसत होते, तसे पत्र देण्यात आले होते. मात्र पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घातले नाही. हा चौकशीचा भाग आहे. ती केली जाईल, पण अशा पद्धतीचे चित्र विरोधकांच्या माध्यमातून उभे केले जात आहे, की, सत्ताधारी किंवा महापौर कंत्राटदारांना पाठीशी घातले जात आहे. अशी वक्तव्ये करून ते मुंबईकरांची दिशाभूल करत असतील तर त्याचा मी निषेध करते.


दुसरी घटना आरे कॉलनी परिसरात घडली. चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी कोसळून 18 वर्षीय हसन रझा जहांगीर आलम सय्यद या तरुणाचा मृत्यू झाला. हसन आपल्या मित्रांसोबत युनिट क्रमांक 13 परिसरातून जात असताना ही दुर्घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या हसनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर त्याचा मित्र जखमी आहे.
गेले काही दिवस मुंबईत पडणार्‍या पावसामुळे दुर्घटनांचे सत्र सुरू आहेत.  30 जून रोजी चेंबूरमधील 11 नंबर रोडवर शाळेच्या बसवर झाड पडून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला. त्यानंतर 2 जुलैला साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षी अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. आज मुंबईत तब्बल 64 ठिकाणी झाडे किंवा मोठ्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. दादर परिसरात सात ठिकाणी झाडे कोसळली. सकाळी दादर परिसरात एका घराच्या छतावर झाड पडले. त्यामुळे छत तुटून फांदी घरात घुसली. शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे स्मारकाजवळ मोठे झाड पडून वाहनांचे नुकसान झाले. दादर स्थानकाशेजारी स्वामीनारायण मंदिर परिसरात झाड कोसळल्याने एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. रानडे रोड, डिसिल्वा रोड आणि कॉसमॉस बँक परिसरातही झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तर वांद्रे, घाटकोपर, विलेपार्ले, माहीम, चेंबूर, वडाळा, वाशी आणि नेरुळ परिसरातही झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पावसाळापूर्व तयारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही झाडांची छाटणी का झाली नाही? दुर्घटना घडूनही प्रशासन ढिम्म का? असे गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित केले जात आहेत.


दरम्यान, ठाण्यात किसननगर परिसरात इमारतीचा भाग कोसळून दोघे गंभीर जखमी झाले, तर मुंब्रा येथे शाळेची संरक्षक भिंत कोसळली. भिवंडीत मुसळधार पावसामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. ड्रेनेज लाईनमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. या पाण्यात उतरून स्पायडरमॅनचा पोशाख परिधान केलेल्या एका तरुणाने चांगलीच स्टंटबाजी केली. डोंबिवली-कल्याण परिसरात पाणी साचले होते. येथील उल्हास नदीची पातळी वाढली होती.
मुंबईत अंधेरी सबवे सलग पाचव्या दिवशी जलमय झाला. पश्चिम उपनगरांतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वसई-विरारमध्ये मिठागर परिसर पाण्याखाली गेला होता. तर नालासोपारा पश्चिमेकडील सोसायट्यांमध्ये कमरेइतके पाणी साचले होते. रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल आणि कर्जत परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला. वसई-विरार शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

वसईपूर्वेतील वालीव येथे राहणारे किसन लोखंडे (50) हे काल दुपारपासून बेपत्ता होते. चहा पिण्यासाठी घराबाहेर पडलेले लोखंडे नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज होता. त्यांचा मृतदेह वसई पूर्वेतील मधुबन परिसरात आढळला. नालासोपारा पूर्वेतील जीवननगर परिसरात पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका अनोळखी इसमाचा काल रात्री मृतदेह सापडला. तर रविवारी नालासोपारा पश्चिमेतील गास येथील भाटोरी तलावात आणखी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडूनसुरू आहे.


दरम्यान, काल नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन परिसरात वेदांत सावंत (20) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. श्री समर्थ चाळीत राहणार्‍या वेदांतच्या घरातील पोटमाळ्यावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीत इन्व्हर्टरचा वीजप्रवाह उतरला होता. पावसामुळे शिडी ओली झाल्याने तिचा स्पर्श होताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वसई पूर्वेतील मधुबन परिसरात महावितरणकडून हायटेन्शन वीजवाहिनीच्या टॉवरसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 20 वर्षीय मजूर सुमित मंडल याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर जात असताना अतिवृष्टीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो त्यात पडला. घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने काल संध्याकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

महामुंबईत आज शाळांना सुट्टी
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन उद्या मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड येथील शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात शाळा आणि कॉलेजला सुट्टी दिली असेल तर ऑनलाईन शाळा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

12,700 कोटींच्या कोस्टल रोडवर पाणीगळती
महागड्या आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणार्‍या मुंबई कोस्टल रोडवर पाणीगळती झाली. संबंधित यंत्रणांनी याची दखल घेत घटनास्थळी तांत्रिक पथक रवाना करून तातडीने दुरुस्तीचे काम केले. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पात अशा प्रकारची गळती आढळल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पावर सुमारे 12,700 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. दक्षिण कोस्टल रोड सुमारे 10 किलोमीटरचा असून, तो मरिन ड्राईव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते वरळी-बांद्रा सी-लिंकपर्यंत विस्तारित आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या गुणवत्ता, देखरेख आणि कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रील की रिअल स्टार? आजी-माजी महापौर पुन्हा वाद
मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याने राजकारणही तापले. झाडांच्या दुर्घटनांवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विद्यमान महापौर रितू तावडे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झाले. रील स्टार की रिअल स्टार, यावरून दोघींनी एकमेकांवर टीका केली. झाड दुर्घटनेवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापौरांनी जबाबदारी स्वीकारावी. तसेच झाडांच्या देखभालीतील निष्काळजीपणा आणि विकासकामांमुळे झाडांची मुळे कमकुवत झाली आहेत. रितू तावडे या केवळ रील स्टार आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर रितू तावडे यांनी विरोधकांवर ते राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, सर्व नियम माहिती असतानाही केवळ गलिच्छ राजकारणासाठी किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी टीका सुरू केली आहे. मला त्यांची घृणा वाटते. मी स्वतः मैदानात उतरले तर मला रील स्टार म्हणतात. मी रील स्टार आहे की रिअल स्टार, हे माझे मुंबईकर ठरवतील. अंधारे यांनी दुसर्‍यांवर टीका करण्यापूर्वी आपल्या दिव्याखाली काय अंधार आहे तो पाहावा. 25 वर्षांचा हिशेब आम्हाला काढता येईल.

बीडीडी चाळ परिसरात झाड कोसळून तिघे जखमी
वरळीतील बीडीडी चाळ परिसरात मोठे झाड कोसळून तीन जण जखमी झाले. त्यासोबत अनेक उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावर झाड हटवण्याचे काम सुरू केले होते.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या