Argentina vs Egypt World Cup: फिफा विश्वचषक 2026 च्या बाद फेरीतील (राउंड ऑफ 16) एका अत्यंत अंगावर काटा आणणाऱ्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने इजिप्तवर 3-2 असा अशक्यप्राय विजय मिळवला आहे. या विजयासह लिओनेल मेस्सीच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली असली, तरी हा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अँटलांटा येथील मर्सिडीज बेंझ स्टेडियमवर तब्बल 68,239 प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला गेला. सामन्यात इजिप्तने उत्तरार्धात व्हीएआर (VAR) द्वारे नाकारलेला गोल आणि पंचांचे काही निर्णय यावरून मोठा राडा सुरू झाला आहे. इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन आणि फॉरवर्ड मोस्तफा झिको यांनी पंचांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावर फुटबॉल प्रेमींनी मुख्य रेफ्री फ्रँकोइस लेटेक्सियर यांच्यावर थेट पक्षपाताचे आरोप केले आहेत.
इजिप्त संतापला! ‘या’ दोन मोठ्या चुकांमुळे पंचांवर टीका
सामन्यादरम्यान असे दोन प्रसंग घडले ज्यांचे निर्णय अर्जेंटिनाच्या बाजूने गेले आणि त्यामुळे इंटरनेटवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला:
- फऊलकडे दुर्लक्ष: पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचा राईट-बॅक नहुएल मोलिना याने हाताचा वापर करून इजिप्तच्या इमॅम अशूरला पाडल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. मात्र, पंचांनी या आव्हानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि कोणताही दंड केला नाही.
- मोहम्मद सालाहला पेनल्टी नाकारली: दुसऱ्या हाफमध्ये इजिप्तचा स्टार खेळाडू मोहम्मद सालाह अर्जेंटिनाच्या बॉक्समध्ये निकोलस टागलियाफिकोच्या धडकेनंतर खाली पडला. व्हिडिओ रिप्ले पाहता टागलियाफिकोचा पाय सालाहच्या पायाला लागल्याचे दिसत होते, ज्यामुळे सालाहचे चेंडूवरील नियंत्रण सुटले. असे असूनही पंचांनी इजिप्तला पेनल्टी दिली नाही.
या दोन्ही घटनांमुळे पत्रकार, माजी खेळाडू आणि तज्ज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अधिकारी जाणीवपूर्वक अर्जेंटिनाची बाजू घेत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
११ मिनिटांचा खेळ अन् मेस्सीची जादू; असा पलटला सामना
सामन्याच्या शेवटच्या 11 मिनिटांपर्यंत इजिप्त या ऐतिहासिक विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता:
- इजिप्तची २-० अशी आघाडी: या सामन्यात यासर इब्राहिम आणि मोस्तफा झिको यांनी उत्कृष्ट गोल करत इजिप्तला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली होती. अर्जेंटिना पराभवाच्या छायेत होता.
- रोमेरोचा पहिला गोल: सामन्याच्या 79 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने दिलेल्या अचूक पासवर क्रिस्टियन रोमेरोने उत्कृष्ट हेडर करत अर्जेंटिनाचे खाते उघडले आणि गोल संख्या 2-1 केली.
- मेस्सीचा आठवा गोल: यानंतर अवघ्या 4 मिनिटांत (83 व्या मिनिटाला) मेस्सीने स्वतः मैदानात जादू दाखवली. त्याने हवेतच एक अप्रतिम व्हॉली मारत गोल केला आणि गोल संख्या 2-2 अशी बरोबरीत आणली. चालू विश्वचषकातील मेस्सीचा हा 8 वा गोल आहे.
- एन्झो फर्नांडिज ठरला हिरो: सामना अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाईम) जाणार असे वाटत असतानाच, इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटाला (92 व्या मिनिटाला) एन्झो फर्नांडिजने अप्रतिम हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाला 3-2 असा थरारक विजय मिळवून दिला.










