Amit Shah and Devendra Fadnavis : नवी दिल्लीत मंगळवारी देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी पार पडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ‘नर्मदा जलप्रकल्प’ संदर्भातील बैठक पार पडली. मात्र, या अधिकृत बैठकीपेक्षा अधिक चर्चा रंगली ती या बैठकीनंतर झालेल्या राजकीय खलबतांची. नर्मदा प्रकल्पाची बैठक संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल तीन तास ‘बंद दाराआड’ स्वतंत्र बैठक पार पडली, ज्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
तीन तासांची स्वतंत्र बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब
अधिकच्या मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या अत्यंत गोपनीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी प्रामुख्याने आगामी काळातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय समीकरणांवर रणनीती आखली. यामध्ये संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, तसेच भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी गटामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या प्रमुख चेहऱ्यांना स्थान द्यायचे, यावर सविस्तर खल झाला. या बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण बाब स्पष्ट झाली असून, सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळात तूर्तास कोणताही बदल किंवा फेरबदल केला जाणार नाही, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली.
नर्मदा जलप्रकल्पाच्या प्रलंबित वादांवर ऐतिहासिक सहमती
तत्पूर्वी, दिल्लीत झालेल्या मुख्य बैठकीत दशकांपासून प्रलंबित असलेल्या ‘नर्मदा खोरे जलप्रकल्पा’बाबत अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अनुराग जैन आणि अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये नर्मदा नदीच्या पाणी वाटपाचा गुंता, प्रकल्पातील बाधित नागरिकांचे प्रलंबित पुनर्वसन आणि जमिनीच्या योग्य मोबदल्याची रक्कम यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जुन्या वादांवर सर्व राज्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण सहमती साधण्यात प्रशासनाला यश आले.
‘पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार नाही’; तावडे-पाटील भेटीनंतर फडणवीसांचा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मुंबईत झालेल्या एका गुप्त भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. शरद पवारांचा गट थेट महायुती किंवा एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या चर्चांमधील हवाच काढून घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हणाले, महाराष्ट्रातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सध्यातरी कोणताही नवीन राजकीय पक्ष सामील होणार नाही. सध्या जे घटकपक्ष आमच्यासोबत महायुतीत आणि एनडीएमध्ये आहेत, तेच कायम राहतील. कोणत्याही नवीन पक्षाला सोबत घेण्याबाबत आमची कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्ही शरद पवार यांच्या पक्षातील कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला फोडण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही आहोत, हे मी अधिकृतपणे स्पष्ट करू इच्छितो.”फडणवीस यांच्या या रोखठोक विधानामुळे गेल्या काही तासांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महायुती प्रवेशाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.










