President Trump : अमेरिका आणि इराण या दोन देशांनी मान्य केलेली 60 दिवसांची युद्धबंदी अवघ्या दोन आठवड्यांत संपुष्टात आली. इराणने काल होर्मुजच्या सामुद्रधुनीत तीन तेलवाहू जहाजावर हल्ले केल्यानंतर आखातात पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनेही आज इराणवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. त्यानंतर इराणने पुन्हा एकदा आखाती देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ही धुमश्चक्री चालू असताना तुर्कीमधील अंकारा येथे नाटो राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान बोलताना इराणबरोबरची युद्धबंदी संपली, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली. मध्य पूर्वेतील या घडामोडींचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,900 अंकांनी कोसळला.
अमेरिका आणि इराणदरम्यान मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला काल इराणने होर्मुजमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा धार चढली. इराणमध्ये अयातुल्ला खामेनी यांचा दफनविधी चालू असतानाच इराणने हे हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने आज इराणच्या तब्बल 80 ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर इराणने आज बहारिनमधील अमेरिकन नौदलाच्या तळावर, तर कुवेतमधील अली अब सालेम या हवाई तळावर हल्ले करण्यात आले.
हे हल्ले सुरू करताच कुवेतमध्ये हवाई रेड सायरन पुन्हा एकदा वाजू लागले आहे. सरकारी वृत्तसंस्था कुनाने देशभर सायरन वाजवले जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कुवेतच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणने कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या साह्याने हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. त्याला कुवैती सैन्य पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यादरम्यान झालेल्या 60 दिवसांच्या युध्दबंदीच्या करारानुसार अमेरिकेने इराणला खुल्या बाजारात कच्चे तेल विकण्याची परवानगी दिली होती. मात्र इराणने पुन्हा हल्ले सुरू करताच अमेरिकेने ही परवानगी मागे घेतली. त्यामुळे इराण आता आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये कच्च्या तेलाची विक्री करू शकणार नाही. 60 दिवसांच्या या युध्दबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 70 डॉलरपर्यंत (प्रति पिंप) खाली घसरले होते. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसू लागली होती.जगभरातील भांडवली बाजारांमध्येही उत्साह दिसून येत होता. मात्र आता युद्ध पुन्हा सुरू झाल्याने बाजारावर मळभ पसरणार आहे.
शेअर बाजारात विक्रमी पडझड
मध्य पूर्वेतील युद्ध पुन्हा सुरू होताच जगभरातील भांडवली बाजारांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. भारतीय शेअर बाजारातही युद्धाच्या वृत्तामुळे हाहाकार माजला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,677.12 अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 516.65 अंकांच्या घसरणीसह 23,882.05 अंकांपर्यंत खाली आला. आजच्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये सुमारे 8.56 लाख कोटी रुपयांची प्रचंड घट झाली. आज मुख्यतः बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.









