Sharad Pawar Has Lost Credibility’: Sanjay Raut’s Sharp Attack Over Eknath Shinde Meeting – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधान भवनातील त्यांच्या दालनात जाऊन बैठक घेतली. यामुळे संतप्त झालेले उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज या भेटीवर अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया दिली. ज्या गद्दाराने आपला पक्ष फोडला त्या शिंदेंसोबत बैठक घेतल्याने शरद पवार यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. आम्ही असतो तर कधीही अजित पवार यांच्या दालनात पाऊल ठेवले नसते, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला.
राऊतांच्या या टोकाच्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शरद पवार गट एनडीएत सामील होऊन भाजपाला पाठिंबा देणार अशी जोरदार चर्चा असतानाच ही भेट झाल्याने संजय राऊत यांचा संताप उफाळून आला. त्यात ही भेट नेमकी कशासाठी होती हे कळले नाही, शरद पवार हे विसाव्यासाठी शिंदेंच्या दालनात गेले हे पटण्यासारखे नाही.
शिंदेसेना आणि शरद पवारांच्या नेत्यांनी सांगितले की, ही बैठक राजकीय कारणासाठी नव्हती. पण शिंदेसेनेचेच दुसरे नेते गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) ताकद वाढलेली दिसेल, असे सूचक वक्तव्य केले. शरद पवार यांनी अनेक वर्षांनंतर विधान भवनात पाऊल ठेवले. त्यातही त्यांना भेटीची वेळ देण्यात आली. ही भेट शिंदे यांच्या दालनात झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असे सर्व नेते उपस्थित होते. शरद पवार गटाला अचानक इतका सन्मान दिला गेल्याने एनडीएशी जवळीक वाढणार असल्याच्या चर्चेला बळ आले आहे.
आज सकाळच्या पत्रकार परिषदेत शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्यात काल झालेल्या बैठकीबद्दल विचारले असता राऊत कमालीचे संतापले. ते भडकून म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. मात्र ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले, पक्ष फोडले त्या एकनाथ शिंदे यांच्या छताखाली बैठक घेतल्याने शरद पवार यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. शरद पवार यांच्यासाठी अख्खे विधान भवन उपलब्ध होते. समोरच राष्ट्रवादी भवन आहे. पण पवारांनी ते सर्व सोडून शिंदेंच्या दालनात जावे हे मनाला पटणारे नाही. कदाचित आम्ही तेवढे सहिष्णु नाही. आम्ही कधीच अजित पवारांच्या दालनात बैठक घेतली नसती. शरद पवार यांचे मन खूपच मोठे असावे, म्हणून त्यांनी असे केले, असे संजय राऊत म्हणाले.
राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना योगेश कदम म्हणाले की, संजय राऊत हे कधीच शिवसेनेचे नव्हते. ते शरद पवार यांचे चेले आहेत. कदाचित चेल्याला सर्वकाही सांगणे गुरुंनी बंद केले असावे म्हणून राऊत चिडले आहेत.
तर शरद पवार गटातील नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि अंकुश काकडे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, विधान भवनातील एकनाथ शिंदे यांचे कार्यालय हे काही त्यांचे वैयक्तिक कार्यालय नाही.
ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय कार्यालय आहे. त्यामुळे तिथे शरद पवार काही क्षणांसाठी गेले तर त्यात काहीही गैर नाही. मुळात ती बैठक नव्हतीच. केवळ काही मिनिटांसाठी शरद पवार शिंदेंच्या दालनात गेले होते. ती राजकीय भेट नव्हती. त्यामुळे शरद पवारांच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कदाचित उबाठा आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे संजय राऊत यांना संताप आला असेल असे काकडे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनीदेखील असाच सूर लावला. ते म्हणाले की, शरद पवार हे कधीच सुडाचे राजकारण करत नाहीत हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. राजकारणात मतभेद असू शकतात. आमचेही सत्ताधारी पक्षांशी मतभेद आहेत.
शरद पवार यांची राजकीय भूमिका स्पष्ट आहे, पण म्हणून सत्ताधारी हे आमचे शत्रू नव्हेत. एकनाथ शिंदे यांचे दालन जिन्यापासून जवळ होते. त्यामुळे शरद पवार त्यांच्या दालनात काही क्षण विसाव्यासाठी गेले. एवढ्या कारणावरून पवार यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही, असे आव्हाड म्हणाले.
शिंदे गटातील नेते किरण पावसकर यांनी मात्र राऊतांवर टीका करीत म्हटले की शरद पवार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी विधान भवनात आले होते. या बैठकीत सीमाप्रश्नावर महत्त्वाची चर्चा होणार होती. चौथ्या मजल्यावरील दालनात बैठक होती. बैठक सुरू होण्यास काही मिनिटे बाकी होती आणि शिंदेंचे दालन रिकामे होते म्हणून शरद पवार तिथे गेले. पवारांचे राजकारणातील स्थान पाहता शिंदेंनी त्यांचे स्वागत केले तर त्यात वावगे असे काही नाही. उलट ही महाराष्ट्राची सभ्य सुसंस्कृत राजकीय संस्कृती आहे. कदाचित संजय राऊत यांना याची जाण नसेल. कारण त्यांची संस्कृती लुटमार करण्याची आहे.
महाविकास आघाडीतील दुसरा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील पवार-शिंदे भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक वेगळी परंपरा आहे. विरोधक असोत किंवा सत्ताधारी, राज्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व पर्याय आपण वापरत असतो. मात्र, त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच नव्हे तर यापूर्वीही आपण हे पाहिले आहे. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली असेल, तर त्यात काहीही गैर नाही. शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे काही कामानिमित्त भेट होणे स्वाभाविक आहे.
केवळ भेट झाली म्हणून त्यावर वाद निर्माण करण्याचे कारण नाही. महाराष्ट्राची राजकीय व्यवस्था ही परस्पर सहकार्याची राहिली आहे. विरोधक आपली भूमिका बजावतातच, पण याचा अर्थ एकमेकांशी भांडणे असा होत नाही. राज्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करणे हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे अशा भेटींना वेगळ्या अर्थाने पाहण्याची गरज नाही, असे पटोले म्हणाले.
उबाठा नेते फडणवीसांच्या भेटीला
विधान भवनात आमदारांच्या गप्पा
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून वादळ उठले असतानाच उबाठा गटाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी उबाठाचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी तसेच माजी महापौर आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर आणि वरळीमधील काही नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. या भेटीची चर्चा सुरू असतानाच भाजपा, शिंदे गट आणि उबाठा आमदारांमध्ये विधान भवन परिसरात अनौपचारिक चर्चाही रंगली. उबाठाचे आमदार सुनील शिंदे, शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विधान भवन परिसरात एकमेकांशी बोलताना दिसले. या सलग भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.









