Jitendra Awad : राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अंतिम आठवड्यात विरोधी पक्षातील आमदारांना पुरेशी बोलण्याची संधी दिली जात नाही, तसेच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सभागृहात जबाबदार मंत्रीच हजर नाहीत, असा गंभीर आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, गृहविभागाचा कारभार आणि थेट लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या धमक्या यांवरून सरकारला धारेवर धरले.
“एक इन्स्पेक्टर मलाच धमकावतोय आणि सरकार त्यालाच पदोन्नती देतेय”
सभागृहात आपल्या भाषणाची सुरुवात करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख करत अत्यंत खळबळजनक आरोप केला. आव्हाड म्हणाले, “मुंब्य्रातील एक पोलीस अधिकारी सध्या मलाच थेट धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ राजकीय वशिल्यामुळे त्याची तिथे वर्णी लागली असून, ‘आपले कोणी काहीच वाकडे करू शकत नाही’ अशा तोऱ्यात तो वागत आहे. विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्याविरोधात सभागृहात हक्कभंग प्रस्ताव प्रलंबित (पेंडिंग) आहे, त्याच अधिकाऱ्याला सरकारने क्राईम युनिट १ चा प्रमुख बनवले आहे. ज्याच्यावर हक्कभंग आहे, त्याच्यावरच जर तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी सोपवायची असेल, तर मग त्यालाच आमदार म्हणून घोषित करून टाका.”
याच अधिकाऱ्याने आपल्यावर ‘पोक्सो’ (POCSO) आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आव्हाड पुढे म्हणाले की, “एक इन्स्पेक्टर राजकारण करत माझा राजकीय प्रतिस्पर्धी बनू पाहत आहे, त्याला तुम्ही कमिशनर क्राईमचा इंचार्ज करता? सरकार अशा पद्धतीने लोकशाहीची सर्व नैतिक मूल्ये (Ethics) पायदळी तुडवत आहे. मी सरकारच्या विचारसरणीच्या विरोधात आहे म्हणून विरोधकांच्या जखमेवर मीठ आणि पेट्रोल टाकण्याचे काम गृहविभागाकडून सुरू आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, ‘कभी न कभी सूरज नीचे जाता ही है, कभी ना कभी उजेला आता ही है’ (कधी ना कधी सत्ता बदलतेच).”
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा; मुंब्रा आणि मोहोळमधील गुन्हेगारीचा दाखला
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढताना सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यातील दोन गंभीर घटनांचा दाखला दिला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका दलित मागासवर्गीय कुटुंबाला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली, मात्र आजपर्यंत या प्रकरणातील एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तसेच, मुंब्रा येथील गुन्हेगारीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “दिल्लीत ६ खून (हत्या) करून आलेला एक सराईत गुन्हेगार बिनबोभाट मुंब्र्यात राहत होता, तरीही तिथल्या स्थानिक पोलिसांना याची साधी भणंगही लागली नाही. याच मुंब्र्यात नदीम नावाच्या एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून त्याच्या घरावर थेट ८ गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यानंतर हवेतही ८ गोळ्या मारण्यात आल्या. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्रातून गायब होणारी लहान मुले जातात कुठे?” – ‘एपस्टीन फाईल्स’चा धक्कादायक संदर्भ
सभागृहात आमदार रोहित पवार यांनी मांडलेल्या लहान मुलांच्या बेपत्ता होण्याच्या आकडेवारीचे समर्थन करत आव्हाड यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक थेरी मांडली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातून हजारो लहान मुले बेपत्ता होत आहेत, ही मुले नेमकी जातात कुठे? मी जागतिक स्तरावर गाजलेल्या ‘एपस्टीन फाईल्स’चा (Epstein Files) सखोल अभ्यास केला आहे. त्यामध्ये असे नमूद आहे की, त्या विशिष्ट बेटावर (आयलँड) जाणाऱ्या लोकांना लहान मुलांच्या मांसापासून बनवलेले खाद्यपदार्थ दिले जायचे. मी अशीही एक वैज्ञानिक थेरी ऐकली आहे की, लहान मुलांना प्रचंड प्रमाणात भीतीखाली ठेवले जाते; त्या भीतीमुळे त्यांच्या शरीरात जे विशिष्ट रसायन (Chemical) तयार होते, त्याचा अर्क जर ५० वर्षांच्या स्त्री किंवा पुरुषाने घेतला, तर त्यांचे वय कमी होते. हे सर्व जागतिक रेकॉर्डवर उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या निष्पाप बालकांच्या मागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे का, याचा सखोल तपास व्हायलाच हवा.”
“आमच्या काळात विरोधकांना आदर दिला जायचा”
भाषणाच्या शेवटी जितेंद्र आव्हाड यांनी भूतकाळातील संसदीय परंपरांची आठवण करून देत सध्याच्या सरकारला सुसंस्कृतपणाचे धडे दिले. ते म्हणाले, “अंतिम आठवडा प्रस्तावाचे एक वेगळे महत्त्व असते. आमच्या सत्ताकाळात जेव्हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव रात्री उशिरा जरी आला, तरी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री सभागृहात उत्तर देण्यासाठी उपस्थित असायचे. त्यावेळी नियमांना अत्यंत महत्त्व देणारे दिलीप वळसे पाटील हे विधानसभा अध्यक्ष म्हणून खुर्चीवर असायचे. विरोधकांनी त्यांची भेट घेतली की, वेळ निश्चित करून बरोबर दुपारी २ वाजता विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू व्हायची. त्या काळात विरोधक असलेले एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे एकेक-दीड तास आक्रमक भाषणे करायचे आणि सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचो.










