USA-Iran : अमेरिका-इराणमधील युद्धबंदी मोडल्यानंतर आखातातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. काल अमेरिकेने इराणच्या सुमारे 140 लष्करी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज इराणने अमेरिकेचे मित्र असलेल्या मध्य पूर्वेतील 6 आखाती देशांवर हल्ले केले. इराणने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुजची सामुद्रधुनीही बंद केल्याची घोषणा केली आहे. यामुळे तेलाच्या दरात पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये सायप्रसचा ध्वज असलेल्या एका जहाजावर इराणने हल्ला केला. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. त्याचे इंजिन निकामी झाले आणि जहाजावरील एक कर्मचारी बेपत्ता झाला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणच्या सुमारे 140 लष्करी ठिकाणांवर पहाटे पाच वाजताच्या सुमारास बॉम्बहल्ले केले. या आठवड्यात अमेरिकेने इराणवर केलेली ही तिसरी लष्करी कारवाई आहे. हे हल्ले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने करण्यात आले. या हल्ल्यानंतर इराणच्या बुशेहर, अलायुसे, चाबहार, बंदर अब्बास, सीरीक, केशम, जास्क या शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामुळे संतापलेल्या इराणनेही आखातीतील अमेरिकेच्या मित्र देशांना लक्ष्य केले. इराणने जॉर्डनचा ‘प्रिन्स हसन एअर बेस’, कुवेतमधील अमेरिकेची ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणाली व रडार केंद्रे आणि बहरिनमधील अमेरिकन लष्करी दळणवळण केंद्र यावर हल्ले केले. तसेच कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेनेही क्षेपणास्त्रे व ड्रोन डागले. इराणच्या हल्ल्यात जॉर्डनमधील कमांड सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. याव्यतिरिक्त, इराणने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुजची सामुद्रधुनी बंद ठेवण्याची घोषणा केली असून, पुढील कारवाईचा इशाराही दिला आहे.
युद्धाची धुमश्चक्री सुरू असतानाच उपग्रह प्रतिमांचा आधार घेत असा दावा केला जात आहे की, इराण ‘पारचिन’सह काही अणु-स्थळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत आहे. अमेरिकेने हे सामंजस्य कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, अमेरिका स्वतःच सामंजस्य कराराचे उल्लंघन करत आहे. दोन्ही बाजूंनी कराराचे पालन केले तरच तो वैध राहील. दरम्यान, खामेनी यांच्या निधनानंतर, नवे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य करत घोषणा केली की, त्यांचे वडील आणि युद्धात मारले गेलेले लोक यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल.
इराणची इच्छा होती की, सर्व जहाजांनी त्याच्या निर्धारित मार्गातून जावे आणि त्याच्या स्थापित परिवहन प्राधिकरणाकडे नोंदणी करावी. यामुळे इराणला होर्मुजच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि भविष्यात शुल्क आकारण्याचा अधिकार मिळाला असता. मात्र ओमानने आपल्या किनार्याजवळ एक नवीन सागरी मार्ग उघडला. यामुळे जहाजांना इराण-नियंत्रित मार्गाला बगल देणे शक्य झाले. या नव्या मार्गामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील त्याची पकड कमकुवत होईल, असे इराणला वाटत आहे.
ओमानजवळ जहाजावरील
हल्ल्यात 1 भारतीय बेपत्ता
इराणने ओमानच्या किनार्याजवळ ’जीएफएस गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर 11 भारतीय होते. त्यापैकी 10 जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मस्कतमधील भारतीय दूतावास ओमान सरकारच्या समन्वयाने शोधमोहिमेवर लक्ष ठेवून आहे. भारताने नागरी जहाजांवरील हल्ले थांबवण्याचे, तणाव कमी करण्याचे आणि या प्रदेशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.











