Coastal Raod Accident : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नवनिर्मित ‘कोस्टल रोड’वर (Mumbai Coastal Road) आज एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटना घडली आहे. कोस्टल रोडवरील अंडरग्राउंड (भूमिगत) बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ काही वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघाताचा फटका एवढा तीव्र होता की, अपघातातील एका कारने बोगद्याच्या आतच अचानक पेट घेतला. कारला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण बोगद्यात काही वेळातच धुराचे प्रचंड लोट पसरले. या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे वरळी ते मरीन लाईन्स दरम्यान धावणाऱ्या सुमारे ४५० ते ५०० हून अधिक गाड्या बोगद्याच्या आतच एकामागोमाग एक अडकून पडल्या. या घटनेमुळे मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे.
प्रवाशांचा जीव टांगणीला; गाड्या सोडून नागरिकांची पळापळ-
बोगद्याच्या आत घडलेल्या या दुर्घटनेचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर समोर आला आहे. बोगद्याच्या आत समोर वाहनांची रांग का लागली आहे आणि गाड्या पुढे का सरकत नाहीयेत, हे पाहण्यासाठी अनेक प्रवासी आपापल्या वाहनातून खाली उतरले. मात्र, समोर एका कारने भीषण पेट घेतल्याचे आणि बोगद्यात धूर भरत असल्याचे दिसताच प्रवाशांचे डोळे विस्फारले आणि तिथे एकच खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली.
आगीची तीव्रता आणि गुदमरवून टाकणारा धूर पाहता, अनेक प्रवाशांनी सुरक्षेचा उपाय म्हणून आपापल्या गाड्या बोगद्यातच जागच्या जागी सोडल्या आणि पायी चालत बाहेरच्या दिशेने पळ काढला. बोगद्यात अडकलेल्या एका प्रवाशाने आतूनच व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत, “कोस्टल रोडच्या अंडरग्राउंड बोगद्यात कारला आग लागली असून संपूर्ण रस्ता ठप्प झाला आहे, कृपया पोलिसांनी आणि प्रशासनाने लवकरात लवकर येऊन आमची सुटका करावी,” अशी आर्त हाक मारली.
पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांची युद्धपातळीवर धाव-
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, वाहतूक नियंत्रण विभाग (Traffic Police) आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकाही (Ambulance) सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
१. आगीवर नियंत्रण: अग्निशमन दलाच्या जवानांनी बोगद्याच्या आत पोहोचून कारला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
२. वाहतूक पोलिसांचे चोख नियोजन: बोगद्याच्या आत अडकलेल्या शेकडो वाहनांना सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान होते. वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बोगद्यात प्रवेश करून अडकलेल्या चालकांना योग्य ते मार्गदर्शन केले.
गाड्या ‘रिव्हर्स’ घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
साधारण ११ किलोमीटर लांबीच्या या वरळी ते मरीन लाईन्स कोस्टल रोडवरील बोगद्यात मागून येणाऱ्या वाहनांना काही अंतरावरच रोखून धरण्यात आले होते. बोगद्याच्या आत अडकलेल्या वाहनांना पुढे जाणे अशक्य असल्याने, पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या सर्व ४५० ते ५०० गाड्या हळूहळू ‘रिव्हर्स’ (मागे) घेण्यास सांगितले.










