Adinath And Urmila Kothare Divorce : मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय, आदर्श आणि चाहत्यांचे भरभरून प्रेम लाभलेले जोडपे अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी आपल्या वैवाहिक प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनंतर या दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा अत्यंत धक्कादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर एक संयुक्त भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. अतिशय विचारपूर्वक, परस्परांच्या संमतीने आणि सामंजस्याने आपण पती-पत्नी म्हणून वेगळे होत असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
डिसेंबर २०११ मध्ये आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर विवाहबंधनात अडकले होते. अनेक वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर आता त्यांनी सहजीवनाचा हा प्रवास थांबवला आहे. आपल्या संयुक्त पत्रकात या जोडीने लिहिले आहे की, “खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास जरी इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही पालक म्हणून नेहमीच एकत्र आहोत. ती आमचे सर्वस्व आहे. तिला उत्तम भविष्य, भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि खंबीर पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही अत्यंत आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि आजवर एकत्र घालवलेल्या सुंदर वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.”
आपल्या चाहत्यांचे आभार मानताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, “गेल्या काही वर्षांत माध्यम क्षेत्रातील मित्र आणि आम्हा दोघांवर प्रेम करणाऱ्या तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि मोलाची साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या अत्यंत संवेदनशील आणि नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच कायम राहतील, अशी आम्हाला आशा आहे.”
आयुष्यातील या कठीण प्रसंगात वैयक्तिक आयुष्याची जपणूक व्हावी या हेतूने त्यांनी जनतेला एक आवाहनही केले आहे. “आमच्या या अत्यंत वैयक्तिक आणि खासगी प्रवासात मीडिया व जनतेने आमच्या गोपनीयतेचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या संपूर्ण विषयावर आमचे हेच पहिले आणि शेवटचे एकमेव वक्तव्य असेल; यापुढे आम्ही यावर सार्वजनिक व्यासपीठावर कोणतीही कमेंट, प्रतिक्रिया किंवा चर्चा करणार नाही.









