Home / महाराष्ट्र / Mankhurd BEST Bus Accident : मानखुर्द अपघातानंतर चालकांच्या अपुऱ्या प्रशिक्षणाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर; १-२ आठवड्यांच्या प्रशिक्षणावर प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे?

Mankhurd BEST Bus Accident : मानखुर्द अपघातानंतर चालकांच्या अपुऱ्या प्रशिक्षणाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर; १-२ आठवड्यांच्या प्रशिक्षणावर प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे?

Mankhurd BEST Bus Accident : मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ (BEST) बसच्या अपघातांची मालिका गेल्या काही महिन्यांत चिंताजनकरीत्या वाढली...

By: Team Navakal
Mankhurd BEST Bus Accident
Social + WhatsApp CTA

Mankhurd BEST Bus Accident : मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ (BEST) बसच्या अपघातांची मालिका गेल्या काही महिन्यांत चिंताजनकरीत्या वाढली आहे. ही चिंता ताजी असतानाच, आज सकाळी सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. मानखुर्द मेट्रो स्थानकाजवळ बेस्टची भरधाव बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन थेट रस्त्यावरील दुभाजकावर (Divider) आदळली. या भीषण अपघातात दुभाजकाजवळ उभे असलेल्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, बस चालक आणि वाहकासह (कंडक्टर) एकूण सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.मात्र, या प्राणघातक दुर्घटनेनंतर बेस्ट प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटी चालकांच्या अपुऱ्या प्रशिक्षणाचा (Inadequate Training) अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

केवळ १-२ आठवड्यांचे नाममात्र प्रशिक्षण; प्रवाशांचा जीव धोक्यात?
या भीषण अपघाताच्या निमित्ताने बेस्टच्या अंतर्गत कारभारातील एक धक्कादायक आणि भीतीदायक वास्तव समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीवर चालकांची भरती केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि वाहतूक कोंडी असलेल्या अवाढव्य महानगरात बस चालवण्यासाठी या नवशिक्या चालकांना केवळ १ ते २ आठवड्यांचे नाममात्र प्रशिक्षण (Short Term Training) दिले जात आहे.

केवळ दोन आठवड्यांचे जुजबी प्रशिक्षण देऊन चालकांच्या हाती लाखो प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी सोपवणे, हा बेस्ट प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदारपणा आहे. मुंबईतील कठीण रस्ते, अवजड वाहतूक आणि वेगाची मर्यादा सांभाळण्यासाठी हे अल्प काळाचे प्रशिक्षण पूर्णपणे निरुपयोगी आणि अपुरे ठरत आहे. जोपर्यंत चालकाला रस्त्यावरील संकटकालीन परिस्थिती हाताळण्याचे योग्य तांत्रिक ज्ञान दिले जात नाही, तोपर्यंत असे जीवघेणे अपघात थांबणे अशक्य आहे.

सकाळी ९.१४ वाजता भीषण दुर्घटना; मेट्रो स्थानकाखालील थरार
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज सकाळी अंदाजे ९ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. बेस्टची मार्ग क्रमांक ‘५०१’ ची बस प्रवाशांना घेऊन सायन-पनवेल महामार्गावरून जात होती. ही बस मानखुर्द मेट्रो स्थानकाखाली असलेल्या विश्वकर्मा रुग्णालयासमोर आली असता, अचानक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही भरधाव बस डाव्या-उजव्या बाजूला हेलकावे खात थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकावर जाऊन प्रचंड वेगाने आदळली. धडक एवढी भीषण होती की, बसच्या समोरील भागाचा पार चेंदामेंदा झाला.

६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत; चालक-वाहकासह सात जण जखमी-
ज्या वेळी हा अपघात घडला, नेमक्या त्याच वेळी मानखुर्द येथील रहिवासी असलेले भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५ वर्ष) हे रस्त ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभे होते. दुभाजकाला बसने मारलेल्या जोरदार धडकेमुळे भास्कर पांडे हे थेट बसच्या खाली आले आणि गंभीररित्या चिरडले गेले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत सर्व जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच भास्कर पांडे यांचा मृत्यू झाला होता; डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात बस चालक आणि वाहकासह पाच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. बस चालक: बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा
२. वाहक (कंडक्टर): वैभव वाघमारे
३. प्रवासी: शिवमंगल मैती (४२), गणेश पटेल (२४), लता वाघेला (४३), राजेश वरुगामिना (३५) आणि अंकिता जाधव (२२).

सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी; पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बसच्या खिडक्यांमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. या भीषण अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द पॅचमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या