NCP Committee : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांतर्गत नाराजी आणि संघटनात्मक बदलांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली प्रमुख नेत्यांची बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीत व्यक्त करण्यात आलेल्या तीव्र नाराजीनंतर, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आता डॅमेज कंट्रोलसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कार्यकारिणीतील त्रुटी आणि सुधारित यादी-
अधिकच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची सुधारित यादी लवकरच निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. यापूर्वी पाठवण्यात आलेल्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या तांत्रिक चुकीमुळे किंवा नियोजित बदलामुळे या दिग्गज नेत्यांना पदावरून दूर करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच, प्रस्थापित नेत्यांना डावलून नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये असंतोष पसरला होता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आता सुधारित यादी पाठवून ज्येष्ठ नेत्यांचे स्थान निश्चित केले जाणार आहे.
महत्त्वाचे फेरबदल आणि संभाव्य गळती-
नव्याने तयार करण्यात येणाऱ्या कार्यकारिणीत काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार:
१. हसन मुश्रीफ यांना कार्यकारिणीत स्थान मिळण्याची दाट शक्यता असून, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांचे नाव वगळले जाऊ शकते.
२. याशिवाय सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही नव्या कार्यकारिणीतून डच्चू मिळण्याची चिन्हे आहेत.
‘देवगिरी’वरील बैठकीतील सत्तासंघर्ष आणि नाराजी-
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन घडले. या बैठकीचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
१. नेत्यांची अनुपस्थिती : प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, सुनील तटकरे आपले मत मांडण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२. तटकरे-भुजबळ वाद: १० जून रोजी होणारा पक्षाचा वर्धापन दिन मेळावा नेमका कोठे घ्यायचा, यावरून सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली. मेळावा मुंबईत घ्यावा की पुण्यात, यावर नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
अर्थखात्यावरून खंत: सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अर्थ खाते परत मिळाले नसल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली.










