PM Kisan 23rd Instalment: देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी आजचा शनिवार अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवार, 20 जून रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर भागाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ म्हणजेच पीएम-किसान योजनेचा 23 वा हप्ता देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित करणार आहेत.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालमधील शेतकरी, पशुपालक आणि तरुणांसाठी विकास योजनांची ऐतिहासिक भेट देणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात, म्हणजेच वर्षाला एकूण 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये बँक खात्यात जमा केले जातात.
PM Kisan 23rd Instalment: योजनेचा लाभ कोणाला मिळतो? पात्रता निकष जाणून घ्या
या आर्थिक साहाय्याचा लाभ मिळवण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- ज्या शेतकरी कुटुंबांच्या नावावर शेतीयोग्य जमीन उपलब्ध आहे.
- पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यांचा समावेश असलेली कुटुंबे, ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन आहे.
- राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेख (जमीन रेकॉर्ड) नोंदींनुसार ओळखले गेलेले शेतकरी.
PM Kisan 23rd Instalment: ‘या’ लोकांना योजनेतून ठेवण्यात आले आहे बाद; यादी तपासा
उच्च आर्थिक स्तर असलेल्या खालील घटकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही:
- कोणत्याही प्रकारच्या संस्थात्मक जमिनीचे मालक असलेले शेतकरी.
- आजी-माजी घटनात्मक पदधारक, माजी किंवा विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष, महानगरपालिकांचे महापौर, तसेच लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य.
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या मंत्रालयांमधील, विभागांमधील सर्व सेवेतील आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी (यात चतुर्थ श्रेणी किंवा ग्रुप D कर्मचाऱ्यांना सूट आहे).
- ज्या निवृत्तीवेतनधारकांना दरमहा 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळते (यातही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सूट आहे).
- गेल्या मूल्यांकन वर्षात आयकर (इन्कम टॅक्स) भरलेल्या व्यक्ती.
- नोंदणीकृत व्यावसायिक जसे की डॉक्टर्स, इंजिनिअर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, वकील आणि आर्किटेक्ट्स.
PM Kisan 23rd Instalment: लाभार्थी यादीत तुमचे नाव ‘असे’ तपासा
आपल्या गावाच्या लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
१. पीएम-किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरील ‘Beneficiary List’ या पेजवर जा.
२. तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
३. ‘Get Report’ या बटणावर क्लिक करा, तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी समोर येईल.
जर तुमचे नाव या यादीत नसेल किंवा अर्ज नाकारला गेला असेल, तर त्यामागे अपूर्ण ई-केवायसी (e-KYC), बँक खाते लिंक नसणे किंवा जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी प्रलंबित असणे ही मुख्य कारणे असू शकतात.
हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक
पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय खात्यात जमा व्हावा यासाठी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. शेतकरी पोर्टलवर जाऊन मोबाईल ओटीपी (OTP) द्वारे किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नोंदणीसाठी बँक खाते तपशील, जमिनीची कागदपत्रे आणि ओळखपत्राची आवश्यकता असते, तसेच बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेत जाऊ पैसे जमा झाले की नाही, याची माहिती घेऊ शकता.










