PPF Withdrawal Rules: भारतामध्ये सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ खात्याकडे पाहिले जाते. केंद्र सरकारची गॅरंटी आणि करांमधून मिळणारी संपूर्ण सूट (EEE स्टेटस) यामुळे देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेत दरमहा पैशांची बचत करतात.
सध्या या सरकारी योजनेवर वार्षिक 7.1 टक्के इतके आकर्षक व्याज मिळत असून, हे व्याज चक्रवाढ पद्धतीने (कंपाउंडिंग) वाढते. मात्र, या योजनेचा मुदतकाळ 15 वर्षांचा असल्याने, अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी मधेच पैशांची गरज पडल्यास काय करावे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडतो.
PPF Withdrawal Rules: मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात का?
होय, जर तुम्हाला १५ वर्षांचा दीर्घ कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पैशांची गरज भासली, तर तुम्ही पूर्ण खाते बंद न करता त्यातील काही रक्कम काढू शकता. या प्रक्रियेला आंशिक पैसे काढणे (पार्शिअल विथड्रॉवल) असे म्हटले जाते. यासाठी सरकारने खालील नियमावली ठरवून दिली आहे:
- ७ व्या वर्षापासून मंजुरी: तुमचे पीपीएफ खाते सुरू झाल्यापासून 6 आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच 7 व्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला खात्यातून पैसे काढण्याची परवानगी मिळते.
- एक उदाहरण समजून घ्या: समजा तुम्ही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आपले पीपीएफ खाते उघडले असेल, तर तुम्हाला आर्थिक वर्ष 2026-27 नंतरच यातून अंशतः पैसे काढता येतील.
- वर्षातून एकदाच संधी: एका संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये लाभार्थीला केवळ 1 वेळाच अशा प्रकारे खात्यातून रक्कम काढता येते.
PPF Withdrawal Rules: खात्यातून नेमके किती पैसे काढता येतात?
पीपीएफ खात्यातून तुम्ही सातव्या वर्षी संपूर्ण रक्कम काढू शकत नाही, तर त्यासाठी एक विशिष्ट मर्यादा ठरवण्यात आली आहे:
- तुम्ही ज्या आर्थिक वर्षात अर्ज करत आहात, त्याच्या आधीच्या वर्षाच्या शेवटी तुमच्या खात्यात जितकी एकूण रक्कम जमा असेल, त्याच्या फक्त 50 टक्के रक्कम तुम्हाला काढता येऊ शकते.
PPF Withdrawal Rules: पैसे काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे?
तुमचे पीपीएफ खाते ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:
- सर्वात आधी तुम्हाला संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून ‘Form C’ (फॉर्म सी) घ्यावा लागेल.
- या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि पीपीएफ खाते क्रमांक अचूक भरावा.
- फॉर्मसोबत तुमच्या पीपीएफ पासबुकची छायांकित प्रत (झेरॉक्स) जोडणे आवश्यक आहे.
- ही कागदपत्रे जमा केल्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे त्याची पडताळणी केली जाईल आणि मंजूर झालेली रक्कम थेट तुमच्या खात्यात वर्ग केली जाईल.
लक्षात ठेवा की, पीपीएफ ही दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे मोठा निधी उभारण्यासाठी अत्यंत उत्तम योजना आहे. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय किंवा कौटुंबिक आणीबाणी सारखी खूप मोठी गरज नसेल, तोपर्यंत या खात्यातील पैशांना हात लावू नये. मधेच पैसे काढल्यास चक्रवाढ व्याजाचा (व्याजावर व्याज) मिळणारा मोठा फायदा कमी होतो.
हे देखील वाचा – IPL 2026 Final: किंग कोहली vs प्रिन्स गिल! RCB रचणार इतिहास की GT मारणार बाजी? कधी व कुठे पाहता येईल फायनल? वाचा










